मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांमुळे गृहमंत्री पदावरून पायउतार व्हाव्या लागलेल्या अनिल देशमुख यांच्याविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय अनिल देशमुखांच्या नागपुरातील घरासह, कार्यालयांमध्ये झाडाझडती देखील सीबीआयने घेतली आहे. या कारवाईवरून सत्ताधारी पक्षाचे नेते व भाजपा नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचे दिसून येत आहे. सीबीआयकडून करण्यात आलेल्या या कारवाईबाबत शिवसेना नेते संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आदी नेत्यांनी शंका उपस्थित करत, भाजपावर निशाणा साधला आहे. यावर आता भाजपा प्रवक्ते केशव उपाध्येंनी प्रत्युत्तर दिले आहे.

अनिल देशमुख यांच्या घर, कार्यालयांसह विविध ठिकाणी सीबीआयची छापेमारी

“उच्च न्यायालयाने सीबीआयला कधीही अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले नाहीत. त्या आरोपांमध्ये काही तथ्य आढळल्यास सीबीआयला कायद्यानुसार पुढे जाण्याचे निर्देश दिलेत. म्हणून चुकीची माहिती पसरवू नका, आम्ही आपल्यासारख्यां प्रतिष्ठित व्यक्तींकडून फेक न्यूज पसरवण्याची अपेक्षा करत नाही.” असं भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेना नेते संजय राऊत व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उद्देशून म्हटलं आहे. यासोबतच त्यांनी न्यायालयच्या आदेशातील मजकूर देखील पाहण्यासाठी जोडला आहे.

याचबरोबर विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी देखील महाविकास आघाडीच्या या नेत्यांच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया दिली आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या टीकेवर प्रवीण दरेकरांनी दिलं प्रत्युत्तर, म्हणाले…

“महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उच्च न्यायालयाचा आदेश स्वतःच्या सोयीने वाचला असल्याने त्यांची अशी वक्तव्य येत आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबत प्राथमिक चौकशीत जे आढळलं असेल, त्याप्रमाणे पुढील तपास करण्याचा अधिकार सीबीआयला आहे.” असं दरेकर म्हणाले आहेत.

“CBI च्या कारवाईमागे राजकीय सूडबुद्धी नसावी, पण जर तसं असेल तर…” देशमुखांवरच्या कारवाईवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

तर, या कारवाईवरून शिवसेना नेते संजय राऊत, “सीबीआयला उच्च न्यायालयाने काही आदेश दिले आहेत. सीबीआय त्यानुसार काम करत असेल. यात राजकीय सूडबुद्धीचा प्रकार नसावा असं मी मानतो. पण जर तसं काही असेल, तर महाविकास आघाडीचं सरकार म्हणून आम्ही यासंदर्भात भूमिका घेऊ”, असं म्हणाले आहेत.

राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी देशमुखांवर धाडसत्र; जयंत पाटील यांनी सुनावलं

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी “या चौकशीच्या मिळालेल्या परवानगीचा उपयोग सीबीआय धाडसत्र घालून राजकीय उद्दिष्टे साध्य करताना दिसत आहे. अशा धाडींचा राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठीच वापर होत आहे, आम्ही याचा तीव्र निषेध करतो,” असं म्हणत अप्रत्यक्षरीत्या भाजपावर टीकास्त्र डागलं आहे.