राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. सामान्य नागरिकांबरोबर पोलीस विभागातही करोनाचे दररोज पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. मागील २४ तासांत राज्यात आणखी ७७ पोलीस करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले असून, एकाचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

सद्यस्थितीस करोनाचा उपाचार सुरू असलेल्या पोलिसांची एकूण संख्या १ हजार १५ वर पोहचली आहे. तर आतापर्यंत करोनामुळे ६० पोलिसांना जीव गमावावा लागला आहे. महाराष्ट्र पोलिस विभागाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूविरोधात देशाच्या सुरू असलेल्या लढाईत करोना योद्ध्यांची भूमिका बजावणाऱ्या पोलिसांना दिवसेंदिवस करोनाचा ससंर्ग होत असल्याच दिसत आहे. नागरिकांनी घरात सुरक्षित रहावे यासाठी, आपल्या जीवाची पर्वा न करता करोना महामारीच्या संकट काळात पोलीस रस्त्यांवर चोवीस तास कर्तव्य बजावत आहे. असे असताना राज्यातील वाढत्या करोना संसर्गाचा आता त्यांना देखील अधिकच फटका बसत असल्याचे दिसत आहे.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात वाढताना दिसत आहे. मागील २४ तासांत तब्बल १८ हजार ६५३ नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, ५०७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या ५ लाख ८५ हजार ४९३ वर पोहचली आहे.

एकूण करोनाबाधितांमध्ये २ लाख २० हजार ११४ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. ३ लाख ४७ हजार ९७९ जणांना उपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत करोनामुळे देशभरात १७ हजार ४०० जणांना जीव गमावावा लागलेला आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत ही माहिती देण्यात आलेली आहे.