देशभरात आज ड्राय रन सुरू असतानाच केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी एक मोठी व देशवासियांना दिलासा देणारी घोषणा केली. करोना लस देशभरात मोफत दिली जाणार, असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. तर, केंद्र सरकारच्या या निर्णयाचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्वागत केलं आहे.

“निश्चितच मी देखील या निर्णयाचं स्वागतच करेल, हा निर्णय अपेक्षितच होता. कारण, मला वाटतं ते भारत सरकारचं उत्तरदायित्व आहे. त्यामुळे असं करायला हवचं होतं. लस ही मोफत असायलाच हवी, लोकांकडून पैसे घेतले गेले नाही पाहिजे.” असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले आहेत.

देशवासियांना करोनाची लस मिळणार मोफत; केंद्र सरकारची महत्त्वाची घोषणा

तसेच, “आपल्या देशात ३५ टक्के जनता ही दारिद्र रेषेखालील आहे. अशा परिस्थितीत जर आपण लसीकरणासाठी पैसे घेत राहिलो तर अतिशय चुकीचा संदेश सरकारबद्दल जातो. त्यामुळे केंद्र सरकाराने घेतलेल्या निर्णयाचं मी स्वागत करतो. राज्य सरकार म्हणून आम्ही कुठही कमी पडणार नाही. ते ज्या सूचना देतील, जे नियम सांगतील त्यांचे आम्ही तंतोतंत पालन करू. राज्यातील जनतेच्या सेवेत आम्ही कुठही कमी पडणार नाही, असा विश्वास मी आरोग्यमंत्री या नात्याने देतो.” असं देखील राजेश टोपे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.

Coronavirus – देशभरात आज ‘ड्राय रन’; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा समावेश

सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. इतरही लसी परवानगीच्या प्रतिक्षेत असून, केंद्र सरकारने लसीकरणासाठीची पूर्वतयारीही सुरू केली आहे. देशभरात ड्राय रन केलं जात आहे. याच दरम्यान केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी करोना लसीसंदर्भात महत्त्वाची घोषणा केली.

“अफवांकडे दुर्लक्ष करा…” केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचं देशवासियांना आवाहन

“देशातील नागरिकांना मी आवाहन करतो की, कोणत्याही अफवांकडे लक्ष देऊ नका. सुरक्षितता आणि लसीची कार्यक्षमता याची खात्री करणे, याला आमचं प्राधान्य आहे. पोलिओ लसीकरणाच्या वेळीही वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा पसरवल्या गेल्या होत्या, परंतु लोकांनी ही लस घेतली आणि भारत आता पोलिओमुक्त झाला आहे,” असं सांगत आरोग्यमंत्र्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं.