करोना टाळेबंदीमुळे आठ महिन्यांपासून बंद असलेली सर्व धर्मीयांची प्रार्थनास्थळे सोमवारपासून उघडण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (शनिवार) केली. या निर्णयानंतर आता श्रेय वादाची राजकीय लढाई सुरू झाल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. मंदिरं उघडण्यासाठी भाजपाने केलेल्या आंदोलनामुळे सरकारला दबावात येऊन, हा निर्णय घ्यावा लागला असल्याचं दरेकर यांनी म्हटलं आहे. तसेच, राज्यातील जनतेला माहिती आहे याविषयी कोणता पक्ष प्रामाणिक होता, असं देखील त्यांनी बोलून दाखवलं आहे.

धार्मिकस्थळं उघडण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे भाजपाने स्वागत केले आहे. मात्र हा निर्णय म्हणजे उशीराचे शहाणपण असल्याचंही भाजपाने म्हटलं आहे. तर, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हा निर्णय अगदी योग्य वेळेवर घेतला गेला असल्याचं सांगितलं आहे.

दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या श्रेय वादावर प्रतिक्रिया देताना आज प्रवीण दरेकर यांनी म्हटले की, ”शेवटी आपण आपला आनंद व्यक्त केला, तर त्यात काय नुकसान आहे? ज्या विषयासाठी आंदोलन उभं राहीलं. हिंदुत्ववादी संघटना, सांप्रदायिक मंडळी ज्यांना भारतीय जनता पार्टीने संपूर्ण ताकदीने समर्थन दिलं. जर केलं आमच्या दबावामुळे, कारण सरकारला तर हे करायचंच नव्हतं. करोनाची दुसरी लाट येणार म्हणून सांगितलं होतं. राजकारणाला बळी पडणार नाही, अशा प्रकारच्या सरकारने घोषणाही केल्या होत्या. परंतु आमचा एवढा दबाव राहिला की त्यांना निर्णय घ्यावा लागला. कारण आज भाविकांना व सांप्रदायिक लोकांना अनन्यसाधारण महत्व आहे. त्या विषयावरून अवलंबू अनेक लोकं त्या ठिकाणी व्यवसायासाठी आहेत. अशावेळी आमच्या दबावाने त्या ठिकाणी निर्णय झाला. आमच्या मनासारखा निर्णय झाल्यावर, जी मागणी आम्ही करतोय, ज्या साठी आंदोलन करतोय त्याचा आनंद व्यक्त केला. तर त्यात गैर काय? शेवटी आमचे उत्सव, प्रथा- परंपरा, दैवतं, मंदिरं ही उत्सवाचीच ठिकाणं आहेत. श्रद्धेची ठिकाणं आहेत, त्यामुळे आनंदोत्सव साजरा करण्यात गैर काही वाटत नाही. तो आम्ही चांगल्या पद्धतीने साजरा करू.”

तसेच, ”भूमिका या दुतोंडी असतात दुटप्पी असतात. श्रेय घ्यायला कोण गेलेलं आहे? श्रेय आम्ही नाही घेत तर मग कुणी घ्यायचं. सांप्रदायिक मंडळींना तरी श्रेय द्याल ना? आणि कधीकाळी हिंदुत्वाच्या रक्षणासाठी शिवसेना असं म्हटलं जायचं. पहिले मंदिर फिर सरकार म्हणून याच राऊतांनी तिथं घोषणा केली होती. मग आता पहिले मंदिरं कुठं गेलं? आता पहिले मंदिर फिर सरकार नाही का? मग जेव्हा महाराष्ट्रातून उठाव झाला. सांप्रदायिक मंडळी मंदिरं उघडण्यासाठी पुढे आली. ज्यावेळी छोटे-मोठे व्यवसायिक या मंदिरावर अवलंबून असणारे पुढे आले. त्यावेळी महाराष्ट्रात कुणी या आंदोलनाचं समर्थन केलं. भाजपा या आंदोलनात उतरली. आम्ही स्वतः या मंदिराबाहेर जाऊन आक्रमकपणे त्यांच्या सोबत सहभागी झालो. आम्ही केलेलं समर्थन आम्ही दिलेला पाठिंबा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेला आहे. त्यामुळे आम्हाला श्रेय घ्यायची गरज नाही. श्रेय वादासाठी आमचा हा विषय मुळीच नव्हता.” असं देखील दरेकर यांनी बोलून दाखवलं.

”महाराष्ट्र हा श्रदाळू आहे. भाविक मोठ्याप्रमाणावर आहे. सांप्रदाय मानणारा मोठा समाज या ठिकाणी आहे. मंदिरावर अवलंबून व्यवसाय करणारे लोकं या ठिकाणी मोठ्याप्रमाणावर आहेत. या सर्वांचा विचार करून भाजपाने या आंदोलनास समर्थन दिलं होतं, किंबहुना स्वतः या आंदोलनात उतरली होती. त्यामुळे श्रेय घ्यायची आवश्यकता नाही. राज्यातील जनतेला माहिती आहे याविषयी प्रामाणिक कोणता पक्ष होता. त्यांना माहिती आहे की भाजपानेच उघडपणे याविषयी भूमिका घेतली होती.” असं यावेळी दरेकर यांनी सांगितलं आहे.