News Flash

“फक्त अजित पवारांवर दबाव आणण्यासाठी ईडीकडून अविनाश भोसलेंवर कारवाई?”

"शिवसेना सोबत आली नाही तर सत्तेसाठी कुठल्याही परिस्थितीला जाण्याचा हा प्रकार आहे"

"प्लॅन बी तयार असावा यासाठी भाजपा अजित पवारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे" (संग्रहित - PTI)

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्यावर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) कारवाई केली आहे. परकीय चलन गैरव्यवहार प्रकरणात ईडीने अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबीयांची ४० कोटी ३४ लाख रुपयांची मालमत्ता सक्तवसुली जप्त केली आहे. दरम्यान हा फक्त अजित पवारांवर दाबाव आणण्याचा प्रयत्नं आहे का? अशी शंका सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी व्यक्त केली आहे.

“अविनाश भोसले अजित पवारांचे निकटवर्तीय आहेत हे सर्वांनाच माहिती आहे. अविनाश भोसले यांची संपत्ती जप्त करत केलेल्या कारवाईवरुन भाजपा किंवा केंद्राकडून आदेश मिळाल्यानंतर ईडी कारवाई करतं हे स्पष्ट दिसत आहे. सीबीआय आणि ईडी या दोन्ही यंत्रणांचा वापर सतत होताना दिसत आहे,” अशी टीका अंजली दमानिया यांनी व्हिडीओच्या माध्यमातून केली आहे.

अविनाश भोसले यांची ४० कोटींची मालमत्ता जप्त

“सध्याच्या घडीला शिवसेनेसोबत ‘प्लॅन ए’ प्रमाणे बोलणी करत असतील तर ‘प्लॅन बी’ तयार असावा यासाठी ते अजित पवारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. यामध्ये किळसवाणं राजकारण आहे. कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळाली पाहिजे हे त्यांचं ध्येय आहे,” अशी टीकाही अंजली दमानिया यांनी भाजपावर केली आहे.

अंजली दमानिया यांनी ट्वीटदेखील केलं असून म्हटलं आहे की, “अविनाश भोसले यांची मालमत्ता ईडीकडून सील? हा फक्त अजित पवारांवर दाबाव आणण्याचा प्रयत्नं आहे का?खरंतर हे व्हायलाच हव, पण ईडी हे भाजपाला सत्ता मिळवून देण्यासाठी करत आहे. अजित पवारांवर व अविनाश भोसले यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई केली असती तर खरंच आनंद झाला असता”.

अविनाश भोसले यांच्यावर कारवाई

अविनाश भोसले कुटुंबीयांची पुणे, नागपूर, गोवा परिसरात तारांकित हॉटेल्स आहेत. तसंच दुबईतील एका कंपनीत भोसले यांची गुंतवणूकही आहे. भोसले यांची ईडीकडून ‘फेमा’(फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट अ‍ॅक्ट १९९९) कायद्यान्वये सप्टेंबर २०१७ पासून चौकशी सुरू होती.

भोसले यांची अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. (अबिल) ही बांधकाम कंपनी आहे. या कंपनीच्या नावाने भोसले तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या बँक खात्यात एक कोटी १५ लाख रुपये एवढी रक्कम ठेवण्यात आली आहे. परकीय चलन व्यवहार प्रकरणात भोसले यांच्याकडून नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे ईडीकडून करण्यात आलेल्या चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर सोमवारी (२१ जून) भोसले तसेच कुटुंबीयांच्या नावावर असलेली ४० कोटी ४३ लाखांची मालमत्ता जप्त करण्यात आली.

भोसले यांची पुण्यातील कोरेगाव पार्क भागात हॉटेल वेस्टीन, गोव्यात हॉटेल डब्ल्यू रिट्रिट अँड स्पा, नागपूरमध्ये हॉटेल ल मेरेडियन ही तारांकित हॉटेल्स आहेत. दुबईतील रोशडेल असोसिएट्स लिमिटेड या कंपनीत भोसले कुटुंबीयांची गुंतवणूक आहे. परदेशातील बँकांमध्ये खाती आहेत. परकीय चलन व्यवहारात नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याप्रकरणी कारवाई करण्यात आल्याचे ईडीकडून कळविण्यात आले आहे. दरम्यान, ईडीने भोसले यांच्या गणेशखिंड रस्त्यावरील कार्यालयातही काही महिन्यांपूर्वी कारवाई केली होती.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2021 12:03 pm

Web Title: social activist anjali damania on ed avinash bhosale ncp ajit pawar bjp sgy 87
Next Stories
1 ओबीसी आरक्षणाशिवाय पोटनिवडणुका; भुजबळांचा सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा
2 रायगड : लस घेतली, पण कुवैतमध्ये मान्यता नसलेली; गळफास घेऊन केली आत्महत्या
3 Maharashtra Unlock: जिल्ह्यांमधले निर्बंध, त्यांची वर्गवारी, सर्वकाही जाणून घ्या फक्त एका क्लिकवर!
Just Now!
X