महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तीन कुटुंबांना तर सातबाऱ्याबाबत गावकीचा आदेश न जुमानल्याने एका; अशा चार कुटुंबांना पाली तालुक्यातील  कोशिबंळे येथे वाळीत टाकल्याची धक्कादायक बाब रायगड जिल्ह्य़ात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाली पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश रायगडच्या अप्पर पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी दिले आहेत. १०८ घरांच्या या छोटय़ा गावात गावकीने सुरु केलेल्या जाचाची अनेक प्रकरणे समोर येऊ लागल्याने खळबळ उडाली आहे.
पांडुरंग सखाराम भोईर यांच्या घरी याच गावातले त्यांचे मामा दत्ताराम मारुती चव्हाण वारंवार येत असत. त्यावर भोईर यांच्या पत्नीचे त्यांच्याशी अनैतिक संबध असल्याचा ठपका गावकीने ठेवला. चव्हाण यांच्याशी संबध ठेवू नये आणि त्यांना घरातही येऊ देऊ नये, असा फतवा गावकीने भोईर यांच्यावर बजावला. हे फर्मान मानायला भोईर तसेच चव्हाण कुटुंबांनी नकार दिल्याने त्यांना बहिष्कृत करून दहा हजारांचा दंड ठोठावण्यात आला. हे प्रकरण मिटवण्यासाठी भोईर यांचे बंधू गजानन व इतर नातेवाईकांनी पुढाकार घेतला. मात्र क्षुल्लक कारणावरून भांडण काढून त्यांना मारहाण करण्यात आली. याबाबत पाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली म्हणून २० हजार रुपयांचा दंड ठोठावून पांडुरंग भोईर, गजानन भोईर आणि नितीन चव्हाण यांच्या कुटुंबांना वाळीत टाकण्यात आले. तेव्हापासून या तीन कुटुंबांना उपेक्षितांचे जीवन जगण्याची वेळ आली. याच गावातील नारायण शांताराम आंबेकर यांना वडिलोपार्जित जमिनीच्या सातबारावर मोतीराम नलावडे यांचे नाव चढविण्याचे फर्मान गावकीने जारी केले होते. मात्र कुठलाही संबंध नसताना त्यांचे नाव चढवण्यास त्यांनी नकार दिल्याने त्यांना वाळीत टाकण्यात आले.  
या चारही पीडित कुटुंबांनी निवेदन दिल्यानंतर तक्रार दाखल झाली असून गावकीतील पंचांविरुद्ध गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.