रायगड जिल्ह्यात दिवसागणिक सामाजिक बहिष्काराची नवी प्रकरणे समोर येत असून आता मात्र एव्हरेस्टवीराच्या कुटुंबाला वाळीत टाकण्यापर्यंत या गावकीची मजल गेली आहे. दुसऱ्या जातीतील मुलीशी लग्न केले आणि ही मुलगी जीन्स घालते म्हणून पोलादपूर तालुक्यातील एव्हरेस्टवीर राहुल तेलंगे याच्या कुटुंबाला बहिष्कृत केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.  एव्हरेस्ट सर करण्यास जेवढय़ा अडचणींना राहुलला सामोर जावे लागले नव्हते त्यापेक्षा जास्त अडचणींना त्याला स्वत:च्या गावात सामोरे जावे लागत आहे.
पोलादपूर तालुक्यातील दुर्गम अशा येलंगेवाडी येथे राहणाऱ्या राहुल येलंगे यांने २०१२मध्ये जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर करून इतिहास घडवला होता. आणि येलंगेवाडी नाव जगाच्या पाठीवर झळकले होते. वास्तविक याचा सार्थ अभिमान बाळगायचा सोडून येलंगेवाडीतील लोकांनी त्याच्यावर उपेक्षेचे जिणे जगण्याची वेळ आणली आहे.
महत्वाची गोष्ट म्हणजे याला कारणीभूत ठरला आहे तो त्यांनी केलेला आंतरजातीय विवाह. राहुल याने पुण्यातील उच्चशिक्षित मुलीशी लग्न केले आहे. विधी पदविकाधारक असलेली पोर्णिमा ही नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करते. त्यामुळे जीन्स घालणे, कुंकू न लावणे, मंगळसूत्र न घालणे हा तिच्या जीवनशैलीचा भाग आहे. मात्र परंपरा आणि जुनाट विचारांचा पगडा असणाऱ्या या गावाला ही गोष्ट खटकते आहे. यातूनच पोर्णिमाला टोमणे मारणे, तिचा मानसिक छळ करणे असे प्रकार घडत आहेत. यातुनच राहुल आणि त्याच्या कुटुंबाला गावकीने वाळीत टाकले आहे. त्याच्या व्यवसायातही अडचणी आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे.
पोलादपूर तहसिल कार्यालयात सामाजिक बहिष्कारासंदर्भात नुकत्याच झालेल्या बठकीत या प्रकरणाला वाचा फुटली आहे. मात्र ग्रामस्थांनी असा काही प्रकार झालाच नसल्याचे सांगत हात वर केले आहेत. राहुल आणि त्याच्या कुटुंबाला वाळीत टाकले नसल्याचे भोगांवचे सरपंच राकेश उतेकर यानी सांगितले आहे.