स्त्री शिक्षणाचा पुरस्कार गोपीनाथ मुंडे यांनी केला. त्यामुळेच त्यांच्यानंतर आम्ही तिघी बहिणी राजकारणात उभ्या आहोत, असे सांगून प्रत्येक घरात सावित्री पाहिजे आणि तिला प्रोत्साहन देणारा जोतिबाही पाहिजे. महिला सक्षमीकरणातूनच खऱ्या अर्थाने समाजाचा विकास होणार असल्याने मुलगी जन्माला आली म्हणून तिला मारू नका, असे आवाहन खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी केले.
 बीड येथे शिवसंग्राम संघटनेच्या वतीने शनिवारी सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे, आमदार भारती लव्हेकर, प्रज्ञाताई रामदासी, सुनंदा कुलकर्णी, अमेरिकेतील उद्योगपती अविनाश राजमाले आदी उपस्थित होते.
डॉ. प्रीतम मुंडे म्हणाल्या, सावित्रीबाई फुलेंनी महिला शिक्षणाची पहिली वीट रोवली. त्यांच्या संघर्षांमुळेच आजच्या महिला विविध क्षेत्रात कर्तबगारी गाजवत आहेत. म्हणून मुलीला आता वाढविले पाहिजे. वडील दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. त्यामुळेच त्यांच्यानंतर आम्ही तिघी बहिणी राजकारणात त्यांचा वारसा चालवत आहोत, असेही त्या म्हणाल्या. विनायक मेटे यांनी महिला व मुलींच्या आरोग्य शिक्षणसाठी शिवसंग्राम भविष्यात काम करणार आहे. महिलांना स्वावलंबी करण्यासाठी विविध मार्गाने मदत करण्यात येणार आहे. आमदार भारती लव्हेकर यांनी मुली या मुलापेक्षा कमी नाहीत. प्रगती करायची असेल तर मुलीला शिकवले पाहिजे, असे आवाहन केले. यावेळी इन्फंटच्या संध्या बारगजे, प्रज्ञा रामदासी यांनीही विचार मांडले. या वेळी  गेवराई तालुक्यातील ऊसतोड मजुराची मुलगी सीमा पवार हिने आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पध्रेत यश मिळवल्याने पुढील स्पर्धाच्या तयारीसाठी शिवसंग्राम संघटनेच्या वतीने रोख २५ हजार रुपयांची मदत विनायक मेटे यांच्या हस्ते देण्यात आली.