सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या पीएने १० लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप शिक्षण संस्थाचालक अरुण निटुरे यांनी केला आहे. मात्र, हे पैसे बडोलेंनी घेतलेले नाही. मंत्र्यांना याची माहिती नसते, असे त्यांनी म्हटले आहे.

अरुण निटुरे यांची आश्रम शाळेसंदर्भातील एक फाईल मंत्रालयात अडकली आहे. आश्रम शाळेला मान्यता व अनुदानाबाबतची ही फाईल असून ही फाईल गेल्या तीन वर्षांपासून पुढे सरकली नाही, असे निटुरे यांचे म्हणणे आहे. निटुरे हे उस्मानाबादचे असून २००२ पासून केशेगाव येथे त्यांची आश्रमशाळा आहे.

निटुरे हे शुक्रवारी मंत्रालयात बडोले यांच्या कार्यालयात गेले होते. कार्यालयात संबंधित अधिकाऱ्याने निटुरे यांच्याशी वाद घातला. पैसे देऊनही काम होत नसल्याने संताप अनावर झाला, असे निटुरे यांचे म्हणणे आहे. संतापाच्या भरात निटुरे यांनी संबंधित अधिकाऱ्याला सर्वांसमक्ष मारहाण केली.

निटुरे यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला या घटनेबाबत प्रतिक्रिया दिली. यात त्यांनी बडोले यांच्या पीएवर गंभीर आरोप केले आहेत. बडोले यांच्या पीएला १० लाख रुपयांची लाच दिली, कार्यालयातील एका अधिकाऱ्याला १ लाख ६० हजार रुपये दिले. तरीही काम होत नसल्याचे निटुरेंचे म्हणणे आहे. हे पैसे बडोलेंनी घेतलेले नाही. मंत्र्यांना याची माहिती नसते. मंत्री चांगले आहेत, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. राजकुमार बडोले यांनी अद्याप या वादावर प्रतिक्रिया दिलेली नाही.