पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वसामान्यांना विविध प्रकारचे अनुदान सोडण्याचे आवाहन करत असताना त्यांच्या पक्षाचे लोक मात्र ‘विशेष सुविधा’ घेत असल्याचे समोर आले आहे. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या मुलीला शासनाची शिष्यवृत्ती देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे ही शिष्यवृत्ती परदेशातील शिक्षणासाठी देण्यात आली असून, शासन निर्णयाच्या माध्यमातून ही बाब उजेडात आली. सामाजिक न्याय मंत्र्यांसोबतच समाज कल्याण विभागाच्या सचिवांच्या मुलालादेखील शासकीय शिष्यवृत्ती मिळाली आहे.

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण घेता यावे, यासाठी सामाजिक न्याय विभागाने एक योजना तयार केली. हुशार आणि होतकरु विद्यार्थ्यांना या योजनेमुळे उच्च शिक्षण घेण्यास मदत झाली. मात्र आता खुद्द सामाजिक न्यायमंत्र्यांच्या मुलीलाच या विभागाकडून शिष्यवृत्ती जाहीर झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राजकुमार बडोलेंची मुलगी श्रुती बडोलेला अॅस्ट्रॉनॉमी आणि अॅस्ट्रॉफिजिक्स विषयांमध्ये पीएचडी करण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. यामुळे तिला इंग्लंडमधील मँचेस्टर विद्यापीठात तीन वर्षे शिक्षण घेता येईल.

विशेष म्हणजे एका बाजूला नरेंद्र मोदी देशातील जनतेला गॅसवरील अनुदान सोडण्याचे आवाहन करत आहेत. मात्र त्यांच्याच पक्षातील नेते आर्थिक परिस्थिती चांगली असताना स्वत:च्याच खात्याचा ‘वापर’ करुन योजनांचा लाभ उकळत असल्याचे समोर आले आहे. न्याय मंत्र्यांच्या मुलीला शिष्यवृत्ती मिळत असल्याने गरजू विद्यार्थ्यांवर मात्र ‘सामाजिक अन्याय’ झाला असल्याचे चित्र आहे. सामाजिक न्यायमंत्र्यांसोबतच समाज कल्याण विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांनीदेखील स्वत:च्या कुटुंबियांचे ‘कल्याण’ करुन घेतले आहे. दिनेश वाघमारे यांचा मुलगा अंतरिक्ष वाघमारेलादेखील शिष्यवृत्ती मिळाली आहे.