फेसबुक, व्हॉट्स अप आदी सोशल नेटवर्किंगचे फायदे व तोटे यावर विचारमंथन होणे गरजेचे असल्याने ‘थिंक बीफोर क्लिक’ या विषयावर येत्या बुधवारी (दि. २५) दुपारी १२ वाजता येथील वेणूताई चव्हाण स्मारक सभागृहात खुल्या महाचर्चेचे  आयोजन करण्यात आले आहे. युवावर्गासाठी ही महत्त्वपूर्ण चर्चा असल्याने युवक-युवतींनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन येथील क्रीडा प्रबोधिनीचे अध्यक्ष नईम कागदी, उपाध्यक्ष गौतम गुणकी यांनी केले आहे.
अल्पसंख्याक विकास मंच व क्रीडा प्रबोधिनीतर्फे ही महाचर्चा घेण्यात आली आहे. त्यात फेसबुकचा वापर कशासाठी असावा, व्हॉट्स अॅप म्हणजे काय, काय शेअर करावे, काय क्लिक करावे, काय शेअर करू नये, या संदर्भातील भारतीय कायदा काय,  सोशल नेटवर्किंगचे फायदे आणि तोटे, इंटरनेट किती गरजेचे इंटरनेटचे फायदे तोटे अशा महत्त्वपूर्ण विषयावर खुली महाचर्चा होणार आहे. महाचर्चेत अपर पोलीस अधीक्षक अमोल तांबे, कराड विभागीय पोलीस अधिकारी मितेश घट्टे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. सरकारी वकील अॅड. संभाजीराव मोहिते, अॅड. सतीश पाटील, सामाजिक कार्यकर्ते नितीश देशपांडे यांची उपस्थिती राहणार आहे. महाचर्चेत जनतेचे प्रतिनिधी म्हणून पत्रकारांनी भूमिका बजवावी तसेच, ही खुली चर्चा मुद्यांच्या अनुषंगाने परिपूर्ण पार पडण्यासाठी विशेषत: महाविद्यालयीन युवक, युवतींसह सर्वच समाजघटकांने उपस्थित राहावे असेही आवाहन संयोजकांनी केले आहे.