भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आक्षेपार्ह चित्रे सोशल मीडियावर टाकून विटंबना केल्याच्या निषेधार्थ भारतीय रिपब्लीकन पक्षाने बुधवारी कर्जत बंदचे आवाहन केले होते. त्याला चांगला प्रतिसाद लाभला. शहरात आज कडकडीत बंद पाळण्यात आला. नगर-सोलापूर राज्यमार्गावर मांदळी येथे तासभर रस्तारोकोही करण्यात आला.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महमंद पैगंबर या महामानवांचे आक्षेपार्ह फोटो फेसबुकवर व इतर ठिकाणी प्रसिध्द करून काही समाज कंटकांनी बदनामी केली. समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न केला. त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सोशल मीडियावर सरकारचे नियत्रंण असावे व अशा समाजकंटकांवर कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांनी केली. श्रीगोंदे येथील होले हॉस्पिटलमध्ये डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मंजुळा साहेबराव साळवे या महिलेचा मृत्यू झाला याबद्दल संबंधित डॉक्टरवर कारवाई करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
शहरातील व्यापाऱ्यांनी सकाळपासूनच सर्व व्यवहार बंद ठेवले होते. दिवसभर बंदच पाळण्यात आला. भारिपच्या वतीने पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. दुपारी नगर-सोलापुर रस्त्यावर सुमारे एक तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनात पक्षाचे तालुकाध्यक्ष संजय भैलुमे, विक्रम कांबळे, दत्ता कदम, संतोष समुद्र, कुंदन भैलुमे, विशाल काकडे, सोहन कदम, सागर कांबळे आदी सहभागी झाले होते.