फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर या समाजमाध्यमांचा (सोशल मीडिया) लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रचंड वापर केल्याचा फायदा भाजपला झाल्याने अन्य पक्षांनीही आता या माध्यमाला गांभीर्याने घेण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने तर पश्चिम महाराष्ट्रातील युवा कार्यकर्त्यांसाठी एक कार्यशाळाच शुक्रवारी आयोजित केली होती. फेसबुक, ट्विटरवर सक्रिय होण्यासोबतच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर ग्रुप बनवावेत, असे आवाहन पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी या कार्यशाळेत केले.
राष्ट्रवादी विद्यार्थी, युवक व युवती काँग्रेसतर्फे पश्चिम महाराष्ट्रातील युवा वर्गासाठी ‘सोशल मीडिया’ कार्यशाळा पार पडली. या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे, जलसंपदामंत्री शशिकांत शिंदे यांच्याबरोबर खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीही हजेरी लावली आणि भाषण झाल्यानंतर युवक-युवतींच्या प्रश्नांनाही उत्तरे दिली.  सोशल मीडिया आणि तरुण वर्ग यांना पक्षाशी जोडण्याचा प्रयत्न म्हणून या कार्यक्रमाकडे पाहिले जात आहे.
या वेळी बोलताना पवार म्हणाले, ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून टीकाटिप्पणीबरोबरच चांगल्या कामाची प्रशंसाही होत असते. तरी, तंत्रज्ञानात होणाऱ्या व्यापक बदलांकडे तरुण वर्गाने दुर्लक्ष करू नये. प्रगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून थोडक्या शब्दांत संवाद साधला जात आहे. ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून ‘व्हॉट्स अ‍ॅप’चे ग्रुप कार्यकर्त्यांनी तयार करावेत. फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅपसारख्या तंत्रज्ञानाकडे दुर्लक्ष केल्यानेच लोकसभा निवडणुकीत आम्हाला फटका बसला. आजचा तरुण वर्ग प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करत असून, हे तंत्रज्ञान अगदी खेडय़ापाडय़ातही पोहोचले आहे. जवळपास ९० टक्के लोकांकडे मोबाइल असून, ८० टक्के तरुण वर्ग व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक, व्टिटर, या तंत्रज्ञानाचा वापर करत आहे.’ फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅपवर झालेली टीका पुढे न पोहोचवता तितक्याच आक्रमकपणे कार्यकर्त्यांनी त्यास उत्तर द्यावे, असे आवाहन शशिकांत शिंदे यांनी केले.  
पवारांसोबत एक दिवस..
राष्ट्रवादी युवक, युवती व विद्यार्थी काँग्रेसकडून स्पर्धा घेतल्या जाणार असल्याचे या कार्यशाळेत सांगण्यात आले. यावर या स्पध्रेतील विजेत्याला बक्षीस देण्याऐवजी शरद पवार यांच्यासमवेत एक दिवस घालविण्याची अपेक्षा उपस्थितांमधून व्यक्त झाली. पवार यांनी ही अपेक्षा मान्य करत तो दिवस कळवा असे सांगितले.