वाचन, संशोधनाने ज्ञान वाढते. त्यामुळे आपण प्रत्येकाने ज्ञानाचे पूजन केले पाहिजे. संगणक वापरामुळे वाचन वाढतच आहे. संगणकावर चांगले वाङ्मय आवर्जून वाचले जाते. सोशल नेटवर्किंगमुळे वाचन, साहित्याला चालनाच मिळाली आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांनी येथे केले.
जिल्हा माहिती कार्यालय, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि शासकीय जिल्हा ग्रंथालय यांच्या वतीने येथील अभिनव बालविकास मंदिरात आयोजित तीन दिवसीय ‘नाशिक ग्रंथोत्सव’चे उद्घाटन सोमवारी डॉ. जामकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. विभागीय माहिती उपसंचालक देवेंद्र भुजबळ अध्यक्षस्थानी होते. केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे, शासकीय जिल्हा ग्रंथालयाचे ग्रंथपाल सूरज मडावी, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र ठाकूर, अभिनव बालविकास मंदिराचे मुख्याध्यापक व्ही. के. भामरे यावेळी व्यासपीठावर होते.
शासनाने राबविलेला ग्रंथ प्रदर्शनाचा उपक्रम कौतुकास्पद आहे. ‘लोकराज्य’च्या माध्यमातून सकारात्मक विचार पुढे येत आहेत. आपण विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांना लोकराज्य मासिकाचे वर्गणीदार व्हावे, असे पत्र दिले असल्याचेही डॉ. जामकर यांनी नमूद केले. जामकर यांनी कुसुमाग्रजांची कविता म्हणून दाखवत व शेरोशायरी करीत उपस्थितांची वाहवा मिळविली. उपसंचालक भुजबळ यांनी जिल्हास्तरावर होणारे ग्रंथोत्सव म्हणजे छोटे साहित्य संमेलनच होय असे नमूद केले.
रवींद्र ठाकूर यांनी प्रास्ताविक केले. माहिती सहाय्यक मोहिनी राणे यांनी सूत्रसंचालन केले. मडावी यांनी आभार मानले. ज्योती बुक सेलरचे संचालक ज्योतिराव खैरनार, महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाचे जनसपंर्क अधिकारी स्वप्नील तोरणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या प्रदर्शनात २५ पेक्षा अधिक स्टॉल मांडण्यात आले आहेत. मंगळवारी दुपारी तीन ते सहादरम्यान केटीएचएम महाविद्यालयातील व्हीएलसी सभागृहात कवी संमेलन होणार आहे. महाराष्ट्र साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य प्रकाश होळकर हे संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असतील. रसिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.