|| सुहास सरदेशमुख

डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ३६ प्रश्नांचा जनुकीय अभ्यास सुरू

गंगा नदीत काही प्रकारच्या डॉल्फिनचा अधिवास आढळल्याने तो गोडय़ा पाण्यातला की खाऱ्या पाण्यातला? सोयाबीनच्या ३१ वाणांपैकी दुष्काळी भागात कमी पाण्यावर कोणते वाण तग धरू शकेल? या आणि अशा ५०हून अधिक प्रश्नांच्या उत्तरांसाठी मागास श्रेणीत गणल्या जाणाऱ्या मराठवाडय़ात संशोधन सुरू आहे.

दुष्काळाचा दाह सोसणाऱ्या मराठवाडा-विदर्भात कमी पाण्यावर सोयाबीनचे कोणते वाण तग धरू शकेल, हे शोधायचे असेल तर सोयाबीनच्या जनुकामध्ये काय बदल होतात, याचा अभ्यास आवश्यक ठरतो. गंगेत काही डॉल्फिनचा संचार असल्याने त्याचे जनुक सापडले तर त्यावर संशोधन करता येईल आणि त्याच्या अधिवासाचे मूळ शोधता येईल, असा विश्वास डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ‘पॉल हेबर्ट सेंटर फॉर डीएनए बार कोडिंग अ‍ॅण्ड बायोडायव्हर्सिटी स्टडीज’ या केंद्रातील ३६ संशोधकांना आहे. हे ३६ संशोधक वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करत आहेत. त्यांच्या अपूर्ण मुदतीचे बाळ आणि पूर्ण वाढ झालेले बाळ यांच्या पोटात होणाऱ्या बदलांमुळे त्याला भविष्यात कोणत्या ‘अ‍ॅलर्जी’ला सामोरे जावे लागेल, याचे संशोधन दिनेश नलगे करीत आहेत. एका अर्थाने जनुक (डीएनए) आता सामाजिक पातळीवर अभ्यासला जात आहे. गर्भाशयाच्या  कर्करोगावरही जनुकाच्या अनुषंगाने संशोधन सुरू आहे. पायाभूत सुविधांची कमतरता असणाऱ्या भागात डीएनए संशोधनासाठी अत्याधुनिक यंत्रणा उभी करण्यात ‘पॉल हेबर्ट सेंटर फॉर डीएनए बार कोडिंग अ‍ॅण्ड बायोडायव्‍‌र्हसिटी स्टडीज’ केंद्राचे संचालक प्रा. गुलाबराव खेडकर आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना यश येत आहे.

जनुकीय संरचना जाणून घेण्यासाठी..

भारतातील समुद्र किनाऱ्यांलगतच्या पाण्यामध्ये किती प्रकारचे सूक्ष्म जीव आहेत, हे त्याचा डीएनए शोधल्यानंतर समजू शकेल. हे सूक्ष्म जीव शोधल्यानंतर समुद्र किनाऱ्याच्या जैवविविधतेमध्ये कोणकोणते बदल होतात, पाण्यातील कोणत्या सूक्ष्म जीवांवर कोणते मासे तग धरू शकतात, याचाही अभ्यास पुढे करता येऊ शकतो. जनुकीय संरचना समजून घेण्याच्या संशोधनासाठीच साडेआठ हजार किलोमीटरचा प्रवास केल्याचे महेश साळुंके या संशोधकांनी सांगितले.

दुष्काळी भागात टिकणारे सोयाबीन

दुष्काळी भागात कोणते सोयाबीनचे वाण किती पाणी असेल तर टिकू शकेल आणि कमी पाण्यात येणाऱ्या सोयाबीनचे जनुक कोणते, याचा अभ्यास अंजली ताठे करीत आहेत. सर्वसाधारणपणे अशा संशोधनात जनुकांचा अभ्यास करण्याची पद्धत नव्हती. मात्र, जनुकीय संरचनेत कोणते वाण पाण्याअभावी टिकू शकेल, हे कळत असल्यामुळे ती जनुकीय रचना अन्य वाणांमध्ये घेता येईल का, यावर त्या संशोधन करीत आहेत.

कोणत्या नदीत कोणते मासे?

कोणत्या नदीमध्ये कोणते मासे अधिवास करतात, याचा अभ्यास इंग्रजांनंतर कोणीही केला नाही. सध्या गोदावरी नदीवर विकास कल्याणकर, तापीवर अमोल कल्याणकर, नर्मदेवर राहुल जमदाडे, महानदीवर राहुल सूर्यवंशी आणि कृष्णा नदीवर महेश शिनगार या पाचजणांनी नदीच्या उगमपासून ते शेवटापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी माशांचे ‘फिन’ नमुन्यादाखल गोळा केले. त्या ‘फिन’च्या आधारे माशांच्या जनुकांची संरचना समजून कोणत्या नदीत कोणते मासे जगतील, याचा अभ्यास केला जात आहे.

सापांच्या जातींचा अभ्यास

सापांच्या कोणत्या जाती कोणत्या भागात अधिक आहे, याचाही अभ्यास या केंद्राने केला. त्यासाठी शंभराहून अधिक सापाची कात केंद्रात मागविण्यात आली. २१ प्रकारच्या सापांचे डीएनए शोधण्यात आले. आता ज्या भागात जी सापाची जात आहे, त्या भागात सर्पदंशावर कोणते औषध वापरावे, हे ठरवता येणे शक्य होणार आहे.

डॉल्फिनच्या पेशीसाठी साडेतीन वर्षे संघर्ष

मराठवाडय़ातल्या संशोधकांपुढे डॉल्फिनच्या पेशीचा नमुना मिळवायचा कसा, असा प्रश्न होता. वन्यजीव विभागाकडून हा नमुना मिळविण्यासाठी साडेतीन वर्षे संघर्ष करावा लागला. डॉल्फिनबाबत संशोधन करणाऱ्या चमूतील चंद्रकांत जाधव या तरुण संशोधकाने केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांना त्याची गरज समजून सांगितली आणि साडेतीन वर्षांनी गोडय़ा पाण्यातील मृत डॉल्फिनच्या पेशी त्याला अभ्यासासाठी मिळाल्या आणि त्याचा जीव भांडय़ात पडला.

जनुकाची सामाजिक प्रश्नांशी सांगड

सर्वसाधारणपणे आपला जैविक पिता कोण, हे शोधण्यासाठी जनुकीय चाचणी करण्यात येते, असा सार्वत्रिक समज आहे. मात्र, या डीएनए बार कोडिंग केंद्रात जनुकाला ‘सामाजिक’ प्रश्नांशी जोडण्यात केंद्राचे प्रमुख प्रा. खेडकर यांना यश मिळत आहे. गुजरात ते केरळ आणि केरळ ते कोलकाता असा साडेआठ हजार किलोमीटरचा समुद्रकिनारा फिरून २७ ठिकाणचे पाण्याचे नमुने महेश साळुंके या संशोधकाने घेतले. नमुने गोळा केल्यानंतर ते उणे २० तापमानात ठेवण्यासाठी स्वत:च एक फ्रीज विकसित केला. त्याला चार्जिग करता येते. तो गाडीच्या पाठीमागे सहजपणे ठेवता येतो. पाणी नमुने घेतल्यानंतर त्याचे तीन वेळा सहा तास शुद्धीकरण केले जाते आणि त्याचा ‘मेंबरेन’ जनुक पाहण्यासाठी घेतला जातो. असे का केले जाते?

विद्यापीठात २०१०मध्ये डीएनए बार कोडिंग व बायोडायव्हर्सिटी स्टडीज केंद्राची स्थापना करण्यात आली. त्यानंतर सात संपूर्ण जनुकीय रचनांचा अभ्यास आता पूर्ण झाला आहे. सहा महिन्यांत १३ संपूर्ण जनुकीय रचनांचा अभ्यास पूर्ण होईल. आण्विक जीवशास्त्र पद्धतीने अन्नाचे प्रमाणीकरण करणारी ही संस्था सामाजिकदृष्टय़ा अधिक उपयोगी ठरावी, असे विषय निवडण्यात आले आहेत.   – प्रा. गुलाबराव खेडकर, केंद्र संचालक