अल्पसंख्याक बहुल खासगी शाळेस मिळणाऱ्या अनुदान प्रस्तावाच्या छाननीसाठी शिक्षिकेमार्फत ४० हजार रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपावरून समाजकल्याण अधिकारी जयश्री रावण सोनकवडे हिला लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. चार शाळांच्या प्रस्तावासाठी प्रत्येकी दहा हजार रुपये संस्थाचालकांकडून सिल्लोड येथे निवासी अपंग शाळेत नोकरी करणाऱ्या शिक्षिकेने घेतले. दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी ही कारवाई करण्यात आली.
अखिल महाराष्ट्र ग्रामीण विकास मंडळ व अक्षर विकास शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने कन्नड, सिल्लोड व औरंगाबाद येथील जटवाडा रस्ता येथे अपंग व विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी शाळा चालविली जाते. अल्पसंख्य बहुल शाळांना पायाभूत सुविधांसाठी अनुदान देण्याची सरकारची योजना आहे. अनुदानाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाने छाननीसाठी समाजकल्याण विभागाकडे पाठविला होता. छाननीनंतर प्रस्ताव परत जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यासाठी समाजकल्याण अधिकारी सोनकवडे हिने प्रत्येकी दहा हजार रुपये मागितले. ही रक्कम अपंग निवासी विद्यालयाची शिक्षिका संगीता पाटील कोलते हिच्याकडे देण्यास सांगितले. दुपारी हडको परिसरातील घरी शिक्षिका पाटीलने लाच स्वीकारली. त्यानंतर अधिकाऱ्यास अटक केल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक प्रकाश कुलकर्णी यांनी दिली.