सिंधुदुर्ग जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाचे वरिष्ठ सहाय्यक विद्यधर राजाराम पवार (वय ५२ वर्षे ) यांना अडीच हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपतप्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी जिल्हा परिषद आवारात रंगेहाथ पकडले.

एका अपंग व्यक्तीने स्वयंरोजगारसाठी २५ हजार रुपयांचे बीज भांडवल मिळावे, यासाठी अर्ज केला होता. हे प्रकरण मंजूर करण्यासाठी विद्यधर पवार यांनी अडीच हजार रुपयांची लाच मागितली होती. त्याची तक्रार सबंधित दिव्यांग व्यक्तीने २ डिसेंबर रोजी कुडाळ येथील लाचलुचपत विभागाकडे केली होती. त्यानुसार सापळा रचत दुपारी दीड वाजता जिल्हा परिषद प्रवेशद्वारावर असलेल्या टपाल मध्यवर्ती कार्यालयाकडे ही रक्कम स्वीकारताना पवार यांना रंगेहाथ पकडले.

पोलिस उपअधीक्षक दीपक कांबळे, अपर पोलिस अधीक्षक मुकुंद हातोडे, पोलीस अधीक्षक डॉ महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नितिन कुंभार, पोलिस निरीक्षक मितेश केणी,  यांनी ही कारवाई केली.