16 September 2019

News Flash

राष्ट्रवादी सोडणाऱ्या नेत्यांबाबत अण्णा हजारे म्हणतात, ‘जैसी करनी वैसी भरनी’

अण्णा हजारे यांनी शरद पवार यांना टोला लगावला आहे

संग्रहित छायाचित्र

राष्ट्रवादी काँग्रेसमधले अनेक दिग्गज नेते पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपात जात आहेत. आता यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘जैसी करनी वैसी भरनी’ ही म्हण वापरत अण्णा हजारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आऊटगोईंगबाबत टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सोडून अनेक नेते भाजपात किंवा शिवसेनेत जात आहेत कारण आहेत ते शरद पवार. साखर कारखाने, बँका लुटून खाल्ल्याचा हा परिणाम असल्याचंही अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.

एवढंच नाही तर त्यांनी भाजपावरही टीका केली आहे. “सत्ता सांभाळायची असते तेव्हा काही भ्रष्ट लोक पक्षात घ्यावी लागतात. भाजपाही त्याचप्रमाणे भ्रष्ट मंडळींना पक्षात प्रवेश देत आहे. जनतेने यांचा निकाल लावावा” असंही अण्णा हजारेंनी म्हटलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अण्णा हजारे यांनी ही टीका केली आहे.

“सध्या भाजपात अनेक नेते प्रवेश करत आहेत. मात्र काही वर्षांनी भाजपा सोडूनही लोक जातील असंही अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.” अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्तुती केली आहे. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोघेही निष्कलंक, भ्रष्टाचारमुक्त आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकार विरोधातल्या घोटाळ्यांची प्रकरणं मागील पाच वर्षांमध्ये आलीच नाहीत. मुख्यमंत्री मी जेव्हा फोन करेन तेव्हा प्रतिसाद देतात. माझं ऐकतात.” असंही अण्णा हजारे म्हणाले आहेत.

“केंद्र सरकारने लोकपाल कायदा आणला. राज्य सरकारने लोकायुक्त आणण्याची कारवाई सुरु केली. विद्यमान सरकार चांगलं काम करतंय मी चांगल्याला चांगलंच म्हणणार” असंही अण्णा हजारे यांनी स्पष्ट केलं. “माझ्याकडे केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात कोणतेही पुरावे येत नाहीत, त्यामुळे मी आंदोलन कुणाच्या विरोधात करु आणि का करु” असाही प्रश्न अण्णा हजारे यांनी विचारला आहे.

 

First Published on September 11, 2019 6:01 pm

Web Title: social worker anna hazare reaction on ncp outgoing and bjp scj 81