कोल्हापूर घंटागाडीस मृत डुक्कर बांधून नेण्यास मज्जाव केल्याने घंटागाडी चालकाने मारहाण केल्याने सामाजिक कार्यकर्ते नरेश सीताराम भोरे यांनी इचलकरंजी नगरपालिकेत रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न सोमवारी केला. सांगली नागरी रुग्णालयात उपचारादरम्यान भोरे याचा मृत्यू झाला.

इचलकरंजी शहरात स्वच्छतेचं काम करणार्‍या घंटागाडीला मृत डुक्कर बांधून फरफटत नेले जात होते. ही  हाताळणी अयोग्य असल्याने भोरे यांनी चालकाला थांबवले असता चालकानं शिवीगाळ केली. भोरे यांनी या प्रकाराविरोधात ठिय्या आंदोलन केले होते पण नगरपालिकेचे संबंधित अधिकारी आंदोलनस्थळी फिरकले नाहीत. त्यावर घंटागाडीचा चालक नगरपालिकेतील संबंधित अधिकारी, कचरा उठाव करणार्‍या मक्तेदारावर कारवाईच्या मागणीसाठी भोरे याने मुख्याधिकारी दालनासमोर आत्मदहनाचा इशारा दिला होता.

आज सकाळ पासून साध्या वेषातील पोलीस आंदोलनावर लक्ष ठेवून होते. मात्र भोरे याने नगरपालिकेच्या मागील प्रवेशद्वारातून वाहन तळाच्या ठिकाणी प्रवेश करून अंगावर रॉकेल ओतून घेऊन पेटवून घेतले. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट पाहून नागरीकांनी आरडाओरडा सुरू केला. पोलिसांनी आग विझवून तातडीने स्थानिक रुग्णालयात हलवले. प्रकृती गंभीर बनल्याने त्याला सांगली नागरी रुग्णालयात हलवले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

याबाबत मुख्याधिकारी संतोष खांडेकर म्हणाले,’भोरे यांच्या तक्रारीनुसार त्या कर्मचार्‍याचा दोन दिवसाचा पगार न देण्याची कारवाई ठेकेदाराने केली होती. पण भोरे यांनी त्याला कामावरून काढून टाकण्याची मागणी केली होती. तो कर्मचारी ठेकेदाराचा असल्याने कामावरून काढून टाकण्याची कारवाई पालिकेला करता येत नाही. तरीही आणखी कडक कारवाई करण्याचे आश्वासन चर्चेवेळी दिले होते. तथापि इतक्या टोकाची भूमिका घेतली जाणे हे आम्अहालाही धक्कादायक आहे.’ अप्पर पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड यांनीही घटनास्थळी माहिती जाणून घेत दोषींवर योग्य ती कारवाई करण्याचा इशारा दिला