* नाहीद काझी यांचे लोकप्रतिनिधींना आवाहन * शहरात ठिकठिकाणी लागलेले बक्षिसांचे फलक

चंद्रपूर : माजी नगरसेविका व सामाजिक कार्यकर्त्यां नाहीद काझी यांनी खासदार, आमदार व मंत्र्यांनी शासकीय रुग्णालयात उपचार घ्यावे आणि ५० हजाराचे बक्षीस मिळवावे असे फलक शहरात लावले आहेत. ते सर्वाचे लक्ष्य वेधून घेत आहेत.

करोनाचे वाढते संक्रमण, त्यामुळे होणारे मृत्यू व आरोग्य व्यवस्थेच्या बाजारीकरणामुळे गरीबांना उपचारासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यात लोकप्रतिनिधी व श्रीमंतांना खासगी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात आर्थिक बळावर वेळीच उपचार मिळत आहेत.

ऑक्टोबरमध्ये एकूण बाधितांची संख्या ११ हजाराच्या जवळ पोहचली असून आजवर १५४ मृत्यू झाले आहेत. भाजपाचे शहर अध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांचे १०० खाटांचे खासगी कोविड हॉस्पीटल सुरू झाले आहे. एकीकडे भाजपा पदाधिकारी एक हजार खाटांचे हॉस्पीटलसाठी आंदोलन करीत आहे तर दुसरीकडे स्वत:चे खासगी हॉस्पीटल उभारत आहे. त्यात सामाजिक कार्यकर्त्यां माजी नगरसेविका नाहीद काझी यांनी शहरात ५० हजारांच्या बक्षिसांचे फलक झळकवले आहेत. जिल्हय़ातील बाधित लोकप्रतिनिधींनी स्वत:चे उपचार हे खासगी हॉस्पीटलमध्ये केले. मात्र जनता शासकीय रुग्णालयात खाटांसाठी फिरत आहे. नाहीद काझी यांनी नागरिकांसाठी नव्हे तर चक्क जिल्ह्य़ातील खासदार व आमदार यांच्यासाठी बक्षीस स्पर्धेचे आयोजन केल आहे. या स्पर्धेत ५० हजार रुपयांचे बक्षीस आहे. मात्र एक अट त्यांनी ठेवली आहे. ती म्हणजे खासदार किवा आमदार दुर्भाग्याने करोनाच्या विळख्यात सापडल्यास त्यांनी उपचार शासकीय रुग्णालयात दाखल घ्यावे. म्हणजेच त्यांना जनतेच्या संवेदना कळतील. यामुळे रुग्णालयातील व्यवस्थेबाबत खासदार किवा आमदार यांना जाणीव होईल. त्यांनी स्वत:चे उपचार शासकीय रुग्णालयात केले तर ते बक्षिसाचे विजेते ठरतील, असे फलक नाझीद काझी यांनी संपूर्ण शहरात लावले आहे. लोकप्रतिनिधींनी आपले मागणी पूर्ण करावी असे काझी यांचे म्हणणे आहे.