आदिवासींसाठी आयुष्य वेचणाऱ्या स्पॅनिश नागरिकाची सरकार दरबारी परवड
तारांकित व्यक्ती आणि सर्वसामान्य यांच्याबाबत नियमांत किती फरक असू शकतो याचे चित्र रायगड जिल्ह्य़ात वास्तव्यास असलेले फादर फ्र्रेडीको सोपाना यांच्या भारतीय नागरिकत्वासाठीच्या अर्जाला सातत्याने फेटाळण्यातून गडद झाले आहे. नुकतेच पाकिस्तानी गायक अदनान सामी याला मानवतेच्या दृष्टीने भारतीय नागरिकत्व देण्यात आले. संपूर्ण हयात रायगडमधील आदिवासींच्या उद्धारासाठी व्यतीत केल्यानंतरही स्पेनमधील नागरिक सोपाना यांना जर्जर अवस्थेत ६७ वर्षे सरकारदारी झगडत राहावे लागले आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्पेन मधून २२ वर्षांचे असताना सोपाना समाजसेवेसाठी भारतात आले. रायगड जिल्ह्य़ातील कातकरी समाजातील आदिवासी सेवेसाठी त्यांनी स्वत:ला वाहून घेतले. यासाठी स्थानिक कायकर्त्यांना हाताशी धरून त्यांनी ‘जनहीत विकास’ ही सामाजिक संस्था सुरू केली. या संस्थेच्या माध्यमातून कातकरी समाजाच्या उन्नतीसाठी विवीध उपक्रम राबवले. लोकांशी संपर्क साधता यावा यासाठी त्यांनी इथली भाषा आणि पेहरावही अंगिकृत केला. आज या घटनेला जवळपास सात दशक
लोटली आहेत. शरीर साथ देत नसले तरी फादर सोपेना यांचे कार्य अव्याहत सुरू आहे.
त्यांच्या समाजकार्यातून जिल्ह्य़ातील अनेक कातकरींचे आयुष्य घडले आहे. २५ वर्षांपूर्वी एका दुर्दैवी अपघातात सोपेना यांना आपला डावा पाय देखील गमवावा लागला . मात्र तरीही त्यांनी समाजसेवेचे व्रत सोडले नाही. ज्या देशात आयुष्याची ६० वर्ष मी खर्च केली, तोच माझा देश आहे. त्यामुळे मला भारतीय नागरिक म्हणून मरायचे आहे, असा पण त्यांनी केला आहे.
सोपानांबाबत वेगळा न्याय का?
फादर सोपाना १९८२ साला पासून भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी धडपडत आहेत. मात्र प्रत्येक वेळी नियमांवर बोट ठेऊन त्यांचा भारतीय नागरिकत्वासाठीचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. आजही त्यांचा अर्ज केंद्र सरकाच्या गृह विभागाकडे प्रलंबित आहे. जर पाकिस्तानी गायक अदनान सामीला मानवतेच्या दृष्टिकोनातून भारतीय नागरिकत्व मिळणार असेल तर मग देशातील दुर्लक्षित घटकांच्या उथ्थानासाठी आयुष्याची जवळपास सात दशक वेचणाऱ्या फादर सोपेना यांना का नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. फादर सोपाना हे सध्या अंधेरीत वास्तव्याला आहेत.

त्यांना हा देश, ही संस्कृती आपलीशी वाटते, त्यांना नागरिकत्व देणे ही तर देशासाठी गौरवाची गोष्ट असणार आहे. भारतीय नागरिकत्व मिळावे या एकाच दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर ते जगत आहेत. शासनाने त्यांच्या अर्जाचा तातडीने विचार करावा.
– वैषाली पाटील,
सामाजिक कार्यकर्त्यां

जनहित विकास संस्थेच्या माध्यमातून फादर सोपेना यांनी आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी केलेले काम मोठे आहे. त्यामुळे त्यांच्या या कामाची दखल घेऊन त्यांनी भारतीय नागरीकत्व देणे गर ठरणार नाही.
– संतोष ठाकूर,
सामाजिक कार्यकत्रे