भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे अशी माहिती समोर आली आहे. ससून जिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांना काळे काळे फासण्याचा इशारा आंदोलनादरम्यान दिला होता. ज्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी तृप्ती देसाई यांना कात्रज येथील घरातून ताब्यात घेतले आहे.

ससून रूग्णालयातील डॉक्टर अजय चंदनवाले यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा तृप्ती देसाईंनी दिला होता. डॉक्टर अजय चंदनवाले यांनी दिव्यांग असल्याचे खोटे प्रमाणपत्र तयार करून सरकारची फसवणूक केली आहे. डॉक्टर अजय चंदनवाले यांनी दिव्यांग असल्याची बनावट कागदपत्रे दिली आहेत आणि त्या आधारे ते गेल्या सात वर्षांपासून एकाच ठिकाणी टिकून आहेत असाही आरोप तृप्ती देसाईंनी केला.  त्यांना पदावरून त्वरित हाकलून द्यावे अशी मागणी तृप्ती देसाईंनी पत्रकार परिषद घेऊन केली होती. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

आठ दिवसात डॉक्टर अजय चंदनवाले यांची हकापलट्टी केली नाही तर त्यांच्या कार्यालयात प्रवेश करून मी त्यांच्या तोंडाला काळे फासेन असा इशारा तृप्ती देसाईंनी दिला होता. तसेच या इशाऱ्यानंतर त्यांनी डॉक्टरांच्या तोंडाला काळे फासण्याचाही प्रयत्न केला होता. त्यानंतर ससूनच्या डॉक्टरांनी पोलिसात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी तृप्ती देसाईंना ताब्यात घेतले.