सोलापुरात करोनाचा कहर आटोक्यात आणण्यासाठी दहा दिवसांची संपूर्ण टाळेबंदी पाळण्यात आली. या कालावधीत प्रशासनाने नवीन बाधित रूग्णांचा शोध आणि त्यांच्यावर उपचार करण्यासाठी जलद चाचण्यांची मोहीम राबविली. यात एकूण २४ हजार ४०५ चाचण्या घेतल्या गेल्या असता त्यातून २,६७२ नवे बाधित रूग्ण सापडले, तर ६५ रूग्णांचा मृत्यू झाला.

दरम्यान, टाळेबंदी संपल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी शहर व जिल्ह्यात ४,३९९ चाचण्या घेण्यात येऊन २९६ बाधित रूग्ण शोधून काढण्यात आले. यात दहा मृतांचा समावेश आहे. आतापर्यंत शहर व जिल्ह्यातील रूग्णसंख्या ७,६७९ वर पोहोचली असून मृतांचा आकडाही ४३० झाला आहे. यात शहरातील रूग्णसंख्या ४,७०७ व मृतसंख्या ३४८ आहे. तर जिल्हा ग्रामीणमध्ये एकूण रूग्णसंख्या झपाट्याने वाढून २,९७२ झाली आहे. तर मृतांचा आकडा ८२ वर पोहोचला आहे.

आज शहरात ३,०४७ चाचण्या घेण्यात आल्या. त्यात १४४ नवे बाधित रूग्ण सापडले. तर तीन रूग्णांचा मृत्यू झाला. दुसरीकडे जिल्ह्यात १,३५२ चाचण्या घेतल्या असता १५२ नवे बाधित रूग्ण आढळून आले. तर सात जणांचा मृत्यू झाला. या सात मृतांमध्ये बार्शीतील तीन मृतांचा समावेश आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ७०१ रूग्णसंख्या बार्शीतील असून मृतांची संख्याही २५ झाली आहे. त्यानंतर १५ मृत अक्कलकोटचे असून तेथील रूग्णसंख्या ४४२ आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील रूग्णसंख्या ५०३ असून मृत ८ आहेत.

दरम्यान, एकीकडे रूग्णसंख्या वाढत असली तरी दुसरीकडे करोनामुक्त होण्याचे प्रमाण लक्षणीय स्वरूपात वाढले आहे. शहरातील करोनामुक्त होण्याचे प्रमाण ६०.७३ टक्के तर जिल्हा ग्रामीणचे प्रमाण ५४ टक्के झाले आहे. मृत्युचे एकूण प्रमाण ५.५९ झाले आहे. यात शहरातील मृत्युचे प्रमाण अद्यापी खाली आले नसून ते ७.३९ टक्के आहे.