News Flash

सोलापूर: भाजपाचे उपमहापौर राजेश काळेंना अखेर अटक

गुन्हा दाखल झाल्यापासून पोलीस त्यांच्या मागावर होते

सोलापूरमधील भाजपाचे उपमहापौर राजेश काळे यांना अटक करण्यात आली आहे. बेकायदा कामांसाठी पालिका आयुक्त पी शिवशंकर यांना शिवीगाळ आणि उपायुक्त धनराज पांडे यांना पाच लाखांची खंडणी मागितल्याचा त्यांच्यावर आरोप होता. तसेच अन्य एका अधिकाऱ्याला बेकायदा काम करण्यासाठी धमकावल्याचाही आरोप होता. अखेर एका आठवड्यानंतर राजेश काळे यांना पोलिसांनी अटक केली.

गेल्या २९ डिसेंबर रोजी रात्री यासंदर्भात पालिका उपायुक्त धनराज पांडे यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात राजेश काळे यांच्याविरोधात फिर्याद नोंदवली होती. त्यानुसार गुन्हा दाखल झाल्यापासून पोलीस त्यांच्या मागावर होते. अखेर मंगळवारी सकाळी राजेश काळे सोलापूरहून पुण्याला जात असताना वाटेत टेंभुर्णीजवळ शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांना सोलापुरात आणल्यानंतर अटकेची कारवाई पूर्ण झाली.

उपमहापौर काळे हे आपल्या संवैधानिकपदाचा गैरवापर करून बेकायदा कामे करण्यासाठी पालिका प्रशासनावर दबावतंत्राचा वापर करीत आहेत. तसेच ॲट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करून बदली करण्याचीही धमकी देत असल्याचे उपायुक्त पांडे फिर्यादीत म्हटले होते. भाजपाचे मजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे कट्टर अनुयायी समजले जाणारे उपमहापौर काळे यांनी गेल्या आठवड्यात जुळे सोलापुरात एका सामूहिक विवाह सोहळ्यासाठी महापालिकेचे साहित्य वापरण्यास पालिका परिमंडळ अधिकाऱ्यांना फर्मावले. परंतु हे काम बेकायदा असून करता येत नाही म्हणून समजावून सांगितले असता संबंधित अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून ॲट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. याच संदर्भात थेट पालिका आयुक्त शिवशंकर यांनाही काळे यांनी अश्लील शिवीगाळ केली. एवढेच नव्हे तर उपायुक्त धनराज पांडे यांना त्यांच्या अखत्यारीतील आरोग्य विभागाशी संबंधित बेकायदा कामे करण्यासाठी दबावतंत्राचा वापर केला. पांडे यांना त्यांच्या बदलीसाठी पाच लाखांची खंडणीही मागितल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

काळे यांच्या विरूद्ध हा पहिलाच गुन्हा नोंद नाही तर यापूर्वीही काही गंभीर स्वरूपाचे फौजदारी गुन्हे पोलिसांत दाखल आहेत. यात पुण्यात पिंपरी-चिंचवड येथील एका गुन्ह्याचाही समावेश आहे.

दरम्यान, या प्रकरणी महापालिकेतील सत्ताधारी भाजपाची प्रतिमा आणखी मलिन झाल्यामुळे शेवटी पक्षाने त्यांना शिस्तभंग कारवाई हाती घेतली आहे. पक्षातून काळे यांना बडतर्फ करण्याबाबत अंतिम निर्णय प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे घेणार असल्याचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2021 12:44 pm

Web Title: solapur bjp deputy mayor rajesh kale arrested sgy 87
Next Stories
1 राजीनाम्याच्या चर्चेवर बाळासाहेब थोरातांनी सोडलं मौन, म्हणाले…
2 बलात्कार पीडितेवर बहिष्कार: निलम गोऱ्हे संतापल्या; गृहमंत्री व ग्रामविकास मंत्र्यांना लिहिलं पत्र
3 ईडी चौकशीवरुन रोहित पवारांनी साधला भाजपावर निशाणा; म्हणाले…
Just Now!
X