पुरेसा पाणीसाठा असूनदेखील सोलापूर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होऊन तीन दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिक अक्षरश: हैराण झाले असून, त्याचा रोष स्थानिक नगरसेवकांवर काढला जात आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या काही नगरसेवकांनी पाणीप्रश्नावर प्रशासनाला धारेवर धरण्यासाठी महापालिकेच्या परिमंडळ कार्यालयांवर मोर्चे काढून रोष व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना इकडे पालिका प्रशासनाने शहराचा पाणीपुरनवठा दोन दिवसांआडऐवजी तीन दिवसांआड करण्याचे धोरण अमलात आणले आहे. दहा लाख लोकसंख्येच्या सोलापूर शहराला उजनी धरणात थेट जलवाहिनी योजनेद्वारे तसेच भीमा नदीवरील टाकळी बंधा-यातून आणि हिप्परगा तलावातून पाणीपुरवठा होतो. शहराला दररोज १३५ दशलक्ष घनलीटर पाण्याची गरज असताना प्रत्यक्षात १०५ दशलक्ष घनलीटपर्यंत पाणी उपलब्ध होते. यात मोठय़ा प्रमाणात गळती असल्यामुळे पाणी कमी व कमी दाबाने मिळते. यातच वीजपुरवठा अधूनमधून खंडित होत असल्यामुळे पाणीपुरवठय़ात व्यत्यय येतो. थापि, वीज महावितरण कंपनीने पालिका प्रशासनाचा हा दावा अमान्य केला आहे.
शहरात १३५ दशलक्ष घनलीटर पाण्याची गरज ही दररोज पाणीपुरवठा करण्यासाठीची आहे. प्रत्यक्षात गेल्या अनेक दिवसांपासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. दोन दिवसाआड पाणीपुरवठा करताना पाण्याची गरजही त्याप्रमाणात अपेक्षित आहे. म्हणजे दररोज सुमारे ७० ते ८० दशलक्ष घनलिटर पाणी उपलब्ध झाल्यास दोन दिवसाआड पाणीपुरवठय़ाची गरज भागते. परंतु आता पालिका प्रशासनाने पाणीपुरवठय़ात गळती होत असल्याचे व अन्य कारणे पुढे करून दोन दिवसाआडऐवजी तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे धोरण अमलात आणले आहे. गेल्या वर्षी पडलेल्या दुष्काळात उजनी धरणात पाण्याचा साठा संपुष्टात आला तेव्हा शहराचा पाणीपुरवठा तीन दिवसाआड करण्यात आला होता. परंतु सद्य:स्थिती उजनी धरणात व अन्य उद्भवांमध्ये पाण्याची उपलब्धता समाधानकारक असतानादेखील शहराच्या पाणीपुरवठय़ात ‘दुष्काळी स्थिती’ दिसून येते.
या प्रश्नावर नागरिकांच्या भावना तीव्र असून स्थानिक नगरसेवकांना उद्देशून प्रश्नांची सरबत्ती केली जात आहे. त्यामुळे संतापलेल्या नगरसेवकांनी नागरिकांची नाराजी पालिका प्रशासनापर्यंत पोहोचण्यासाठी पालिका परिमंडळ कार्यालयांवर मोर्चे काढून आंदोलने हाती घेतली आहेत. सोमवारी सकाळी भवानी पेठेतील भाजपचे नगरसेवक सुरेश पाटील व अंबिका पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुमारे दोनशे नागरिक व कार्यकर्त्यांनी पालिका परिमंडळ कार्यालय क्रमांक ३ वर मोर्चा काढून प्रशासनाला जाब विचारला. तर पालिका सभागृह नेते महेश कोठे यांच्या पूर्व भागातील प्रभागात गेल्या आठ दिवसांपासून पाण्याची ओरड आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी पालिकेत येऊन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्यासमोर गाऱ्हाणे मांडले. या वेळी नगरसेविका श्रुती मेरगू या उपस्थित होत्या. मात्र नवीन जलवाहिनी टाकल्याशिवाय पाण्याची परिस्थिती सुधारणार नाही, असे प्रशासनाकडून सांगितले गेले.