महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारात सोलापूरच्या काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना संधी न मिळाल्याबद्दल संतप्त होऊन आंदोलन करताना सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांचेच हे राजकीय कारस्थान असल्याचा आरोप करीत त्यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळला होता. परंतु हे कृत्य चांगलेच अंगलट आले असून आता त्याबद्दल युवक काँग्रेसने खरगे यांच्याकडे ‘माफीनामा’ पाठविला आहे.

काल शुक्रवारी दुपारी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास करगुळे व प्रदेश सरचिटणीस तथा नगरसेवक विनोद भोसले यांच्या नेतृत्वाखाली युवक कार्यकर्त्यांनी पक्षाचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्या विरोधात रोष व्यक्त करीत त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले होते. त्या वेळी त्यांच्या विरोधात मुर्दाबादच्या घोषणा देताना पक्षाच्या प्रभारीपदावरून त्यांच्या हकालपट्टीची मागणीही केली होती.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना मंत्रिमंडळात संधी न मिळाल्याने स्थानिक युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह अन्य आघाडय़ांच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले होते. हे राजीनाम्यांचे सत्र सुरू असताना दुसरीकडे युवक काँग्रेसने धरणे आंदोलनही केले होते. जिल्हाध्यक्ष नितीन नागणे यांनी तर स्वत:च्या रक्ताने पक्षश्रेष्ठींना निषेधाचे पत्र लिहिले होते. त्याचवेळी पक्षश्रेष्ठींच्या विरोधात बेछूट विधानेही करण्यात आली होती. एवढेच नव्हे तर आमदार प्रणिती शिंदे यांना मंत्रिपदाची संधी न मिळण्यामागे पक्षाचे प्रदेश प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांचा हात असून त्यांनीच हे कारस्थान केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यांचा पुतळा जाळण्याचा इशारा देऊन त्यानुसार पुतळ्याचे दहन करण्यात आले होते. अशा प्रकारे गेल्या चार-पाच दिवसांपासून हे अनियंत्रित आंदोलन सुरू असताना शिंदे समर्थक आंदोलकांना आवरण्याचा प्रयत्न कोणीही केला नाही.

तथापि, शेवटी या आंदोलनाची गंभीर दखल प्रदेश पक्षश्रेष्ठींनी घेतल्यानंतर सोलापुरातील युवक काँग्रेसचे पदाधिकारी भानावर आले. युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास करगुळे यांनी स्वत:च्या सहीने पक्षाचे प्रदेश प्रभारी खरगे यांना माफीनामा पाठविला आहे. पक्षाकडून आमच्यावर जी कारवाई होईल ती आम्हाला मान्य राहील, असेही माफीनाम्यात नमूद करण्यात आले आहे. तसेच आमदार प्रणिती शिंदे यांच्या सांगण्यावरून खरगे यांचा पुतळा जाळण्यात आला नाही, असेही स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

दरम्यान, आमदार प्रणिती शिंदे यांना मंत्रिपद न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त करीत पक्षाचे शहर सरचिटणीस केशव इंगळे, राजन कामत, प्रवक्ते हसीब नदाफ,उपाध्यक्ष अंबादास गुत्तीकोंडा, मनीष गडदे, विश्वनाथ साबळे, चंद्रकांत कोंडगुळे, अ‍ॅड. करिमुन्निसा बागवान, हणमंतु सायबोलू, देवेंद्र भंडारे, सुरेश पाटोळे आदींनी पदांचे सामूहिक राजीनामे पक्षाचेप्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाठविले आहेत.