बलात्काराच्या खटल्यातील आरोपीने वकील असलेल्या पीडित महिलेला तीन लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून खटल्यात आपल्या बाजूने जबाब देण्यासाठी तिच्या तोंडात विषारी द्रवपदार्थ ओतले आणि तिच्या खुनाचा प्रयत्न केला. आश्चर्य म्हणजे हा धक्कादायक प्रकार या खटल्यातील सरकारी वकिलाच्या खासगी कार्यालयात घडला. यासंदर्भात पोलिसांनी संबंधित आरोपीविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
यासंदर्भात संबंधित पीडित वकील महिलेने जेलरोड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार जिल्हा न्यायालयासमोरील फाईव्हस्टार हॉटेलनजीक व्यापार संकुलातील सहायक सरकारी वकिलाच्या कार्यालयात काल शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास हा प्रकार घडला. यात पोलिसांनी निखील नेताजी भोसले (वय ३५, रा. होटगी रोड, सोलापूर) याच्या विरूध्द खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबतची माहिती अशी, की यातील पीडित वकिलाला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली निखील भोसले याच्याविरूध्द गेल्या वर्षी पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. यात पीडित महिला वकिलाला धमकावल्याबद्दल आरोपी निखील भोसले याचे मामा तथा माजी आमदार दिलीप माने व इतरांनाही आरोपी करण्यात आले होते. परंतु त्याचवेळी माने यांनी हे आरोप फेटाळले होते.
या पाश्र्वभूमीवर हा खटला सोलापूर सत्र न्यायालयात सुनावणीस आला असताना या खटल्यातील सहायक सरकारी वकिलाने पीडित महिला वकिलास स्वत:च्या कार्यालयात बोलावून घेतले.

त्यानुसार पीडित महिला वकील गेली असता तेथे आपल्या खटल्यातील आरोपी निखील भोसले व त्याचा सहकारी नितीन भोपळे उपस्थित होते. त्यावेळी सहायक सरकारी वकिलाने पीडित महिला वकिलास सांगितले की, निखील भोसले यास तुम्हांला काही तरी सांगायचे आहे. त्यानंतर आरोपी भोसले याने, तीन लाख रुपये घे आणि खटल्यात आमच्या बाजूने जबाब दे, असे सांगितले. तेव्हा पीडित महिला वकिलाने त्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे चिडून आरोपी निखील भोसले याने आपल्याजवळील ‘ऑल आऊ ट लिक्वि ड’ नावाच्या विषारी द्रव पदार्थाची छोटी बाटली काढून फिर्यादी पीडित महिला वकिलाच्या तोंडाला घातली. परंतु प्रसंगावधान राखून तिने तो विषारी द्रव पदार्थ तोंडात जाऊ दिला नाही. ओतलेला विषारी द्रव पदार्थ तिच्या अंगावरील कपडय़ावर व स्कार्फवर पडला. हा सर्व जीवघेणा प्रकार घडत असताना संबंधित सहायक वकील आणि नितीन भोपळे या दोघांनी आरोपी निखील भोसले यास अजिबात रोखले नाही, असेही फिर्यादीत म्हटले आहे.