झटके येण्याच्या (अपस्मार) आजाराने पछाडलेल्या एका अल्पवयीन मागासवर्गीय मुलीवर मंत्रविद्येने उपचार करण्याच्या नावाखाली वारंवार लैंगिक अत्याचार केले आणि ती मुलगी मागासवर्गीय जातीची असल्याचे कारण सांगून लग्न करण्यास नकार दिला. जन्मलेल्या मुलीची जबाबदारीही ढकलून दिल्याप्रकरणी एका मांत्रिकाविरूध्द पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात हलगर्जीपणा झाल्याचे उजेडात आले आहे. त्याची गंभीर दखल घेत सोलापूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने संबंधित सहायक पोलीस आयुक्तासह तीन पोलीस अधिका-यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. शहरातील सदर बझार पोलीस ठाण्याशी संबंधित हे प्रकरण आहे.

शिवाजी सिद्राम कोल्हे (वय ३७, रा. काळी मशिदीजवळ, पत्रा तालीम, सोलापूर) या नावाचा मांत्रिक या गुन्ह्यातील आरोपी आहे. यातील पीडित मुलगी ही मागासवर्गीय समाजाची असून तिला लहानपणापासून झटके येण्याचा (अपस्मार) आजार होता. वैद्यकीय उपचार करूनही आजार बरा होत नव्हता. त्यामुळे नातेवाईकांच्या सांगण्यानुसार पीडित मुलीवर मांत्रिक शिवाजी कोल्हे याजकडून उपचार घेण्यात येऊ लागले. २०१५ पासून हे मांत्रिक उपचार सुरू असताना त्यावेळी पीडित मुलगी अल्पवयीन होती. परंतु अंधश्रध्देचा गैरफायदा घेऊन मांत्रिक शिवाजी कोल्हे याने पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केले. उपचार बरा होत नाही म्हणून पीडित मुलीला कर्नाटकातील मंत्रालय येथे नेऊन उपचार करून घेण्यास तिच्या पालकांना राजी केले.

त्याप्रमाणे मांत्रिक कोल्हे याने मंत्रालय येथे पीडित मुलीला नेऊन एका घरात ठेवले आणि तिच्यावर पुन्हा लैंगिक अत्याचार केले. प्रत्येकवेळी तो पीडित मुलीसमोर हळद-कुंकू व लिंबू ठेवून काहु तरी खायला द्यायचा. त्यातून मुलीला गुंगी चढायची. नंतर मांत्रिक कोल्हे हा आपला कार्यभाग साधायचा. शारीरिक संबंधातून पीडित मुलगी गरोदर राहिली आणि तिने मुलीला जन्म दिला. तत्पूर्वी, आपले बिंग फुटले, तेव्हा मांत्रिक कोल्हे याने मुलीबरोबर लग्न करण्याची हमी दिली होती. परंतु नंतर तो टाळाटाळ करू लागला. शेवटी त्याने धमकावणे सुरू केले. एवढेच नव्हे तर एके दिवशी त्याने स्वतःच्या घरात दोन व्यक्तींना आणले आणि हे दोघे साधूसंत असल्याचे सांगत त्यांच्याबरोबर शरीर संबंध ठेवण्याचा आग्रह केला. त्यास नकार दिल्याने मुलीला बेदम मारहाण झाली. नंतर पीडित मुलगी खालच्या जातीची आहे. आपण उच्च जातीचे आहोत, असे म्हणून त्याने लग्नास नकार दिला.

याप्रकरणी पीडित मुलीने अखेर पोलिसांत धाव घेतली. सदर बझार पोलीस ठाण्यात संबंधित मांत्रिक शिवाजी कोल्हे याच्याविरूध्द भारतीय दंड विधान कलम ३७६ नुसार गुन्हा नोंद करताना पोलिसांनी हा प्रकार जादूटोणा आणि अघोरी विद्या प्रतिबंधक कायदा, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील कलमांशी संबंधित असूनही त्याप्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला नाही. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्तामार्फत होणे अपेक्षित असताना त्यापेक्षा कनिष्ठ दर्जाच्या सहायक पोलीस निरीक्षकाकडे तपास देण्यात आला.

दरम्यान, आरोपी मांत्रिक शिवाजी कोल्हे हा गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिसांना सापडतही नव्हता. त्याने स्वतःची अटक टाळण्यासाठी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. त्यावरील सुनावणीप्रसंगी जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांनी, या गुन्ह्याची नोंद करताना पोलिसांनी केलेला हलगर्जीपणा न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला.या गुन्ह्यात जादूटोणा प्रतिबंधक कायदा, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक (ॲट्रासिटी) कायद्यातील कलमांखाली कारवाई करण्याबाबत पोलिसांकडील विधी अधिकाऱ्याने स्पष्ट अभिप्राय दिला असतानाही पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे ॲड. राजपूत यांनी न्यायालयात सांगितले. त्याची गंभीर दखल घेत जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एल. जोशी यांनी संबंधित परिमंडळाच्या सहायक पोलीस आयुक्तासह सदर बझार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे व पोलीस तपास अधिकारी सोळुंखे या तिघा पोलीस अधिकाऱ्यांची पोलीस आयुक्त यांनी चौकशी करून कारवाई करावी, असे आदेश दिले. अर्थात आरोपी शिवाजी कोल्हे याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला.