जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी सत्ताधारी राष्ट्रवादीच्या विरोधात भाजपा व पुरस्कृत महाआघाडीने मोठे काहूर माजविले आहे. कोणत्याही परिस्थितीत सत्ता काबीज करायचीच, असा चंग भाजपाने बांधला असताना महाआघाडीच्या नावाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आतले आणि बाहेरचे असा संघर्ष दिसून येतो. उद्या जर खरोखर  जिल्हा परिषदेत सत्ता परिवर्तन झाले, तर पुन्हा सत्तेच्या चाव्या पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादीशीच संबंधित ‘बाहेर’च्या मंडळींच्या हाती जाण्याची रणनीती होऊ शकते. अर्थात या घडामोडीविषयी राष्ट्रवादीची मंडळीही सोयीस्कर मौन बाळगून आहे.

सोलापूर जिल्हा तसा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो. राष्ट्रवादीच्या अगोदर तब्बल ४२ वर्षे अकलूजचे मोहिते-पाटील यांच्या गटाकडे जिल्ह्य़ातील प्रमुख सत्ताकेंद्रांची सूत्रे . परंतु अलीकडे सात-आठ वर्षांत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा शब्द प्रमाण मानला जाऊ लागला. त्यामुळे राष्ट्रवादीत गटबाजी फोफावली . मोहिते-पाटील यांच्या विरोधात म्हणून अजित पवार यांच्यावर निष्ठा ठेवून जिल्हा परिषदेचा कारभार होत असताना सभापतिपदाच्या निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव घडवून आणला गेला.

या राजकारणात तत्कालीन जि.प. अध्यक्ष व उपाध्यक्षांसह सर्वाचा उघड सहभाग होता. त्यानंतर  जि.प.ची सूत्रे ताब्यात ठेवणारे संजय शिंदे, पंढरपूरचे प्रशांत परिचारक आदी मंडळींनी मागील विधानसभा निवडणुकीत राष्टवादीतून बाहेर पडत स्वाभिमानी शेतकरी संघटनेची वाट धरली. प्रशांत परिचारक यांनी तर विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीत सुरुंग पेरून भाजपा पुरस्कृत अपक्ष म्हणून विजय मिळविला. या विजयाचे शिल्पकारही अर्थातच पूर्वाश्रमीचे अजितनिष्ठ संजय शिंदे हेच ठरले. त्यानंतरही जिल्हा परिषदेची सूत्रे शिंदे-परिचारक प्रभूतिंकडेच कायम राहिली ती आजतागायत.

संजय शिंदे हे माढय़ाचे राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांचे बंधू तर आमदार प्रशांत परिचारक हे पंढरपूरचे ज्येष्ठ नेते सुधाकर परिचारक यांचे पुतणे. या जोडगोळीने जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीला सुरुंग लावून भाजपा पुरस्कृत महाआघाडी स्थापन केली असून त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट संपर्क वाढवत जिल्ह्य़ातील जवळपास सर्व विरोधकांना एकत्र आणले आहे. भाजपाने आपल्या चिन्हावर निवडणुका लढविल्या जाव्यात, असा आग्रह धरत त्यासाठी या बहुपक्षीय मंडळींना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार बार्शीचे शिवसेनेचे माजी आमदार राजेंद्र राऊत, माळशिरसचे मोहिते-पाटील विरोधक उत्तम जानकर आधी निवडक मंडळी भाजपामध्ये आली खरी; परंतु सारे जण भाजपामध्ये आले तर जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करताना गणिते जुळविता येणार नाहीत, याचा विचार करून भाजपा पुरस्कृत महाआघाडी कायम राहिली. या महाआघाडीच्या प्रचाराचा नारळ स्वत: मुख्यमंत्री फडणवीस यांनी फोडला.

या पाश्र्वभूमीवर जिल्हा परिषदेत उलथापालथ करण्यासाठी भाजपा व पुरस्कृत महाआघाडीने जोमदार प्रयत्न चालविले असताना संजय शिंदे यांनी माढा तालुक्यात राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांच्याशी असलेल्या बंधुप्रेम कायमच राखले आहे. संजय शिंदे यांच्या विरोधात राष्ट्रवादीने उमेदवारही उभा केला नाही. एवढेच नव्हे तर माढा भागात संजय शिंदे यांनी राष्ट्रवादीबरोबर एकत्र नारळ फोडल्याचेही दिसून आले आहे. या राजकीय गोंधळावर राष्ट्रवादीसह सारेच मौन बाळगून आहेत. या पाश्र्वभूमीवर माळशिरसमध्ये मोहिते-पाटील यांच्यासह बार्शीत आमदार दिलीप सोपल, करमाळ्यात रश्मी बागल तर मोहोळमध्ये जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजन पाटील यांची मोठी कोंडी झाली आहे.

हा संपूर्ण भाग राष्ट्रवादीचा  बालेकिल्ला. भाजपा पुरस्कृत महाआघाडीने माढय़ाचा अपवाद वगळता बहुतांश भागात प्रस्थापित राष्ट्रवादीला अक्षरश: घाम फोडला आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादीतही चाललेल्या गोंधळाविषयी पक्षाचे कोणीही नेता बोलायला तयार नाही. अजित पवार हेच काय, पक्षाचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे हे देखील मौन बाळगून आहेत. निवडणुकांच्या प्रचाराचा शेवटचा टप्पा असूनही पक्षाचे नेते अजित पवार किंवा अन्य नेते सोलापूरकडे फिरकले नाहीत. त्याचा राजकीय वर्तुळात वेगळा अन्वयार्थ काढला जात आहे.