ऊसतोडीसाठी मध्य प्रदेशातून दक्षिण सोलापुरात आलेल्या आणि ऊसतोडीचा पुरेसा अनुभव नसल्यामुळे तेथेच अडकून पडलेल्या ५२ मजुरांना सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मदतीचा हात दिला. या सर्व मजुरांना विशेष बसने मध्य प्रदेशात परत पाठविण्यात आले. या घटनेची दखल घेऊन मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची ट्विटरच्या माध्यमातून प्रशंसा केली आहे.

मध्य प्रदेशातील कटनी येथून सुमारे नऊशे किलोमीटर अंतरावरून रोजगारासाठी ५२ मजूर व त्यांचे कुटुंबीय ऊसतोडणीच्या कामासाठी सोलापुरात आले होते. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथे मुकादम सुनील मोटे यांनी अनामत रकमा घेऊन ऊसतोडीचे काम सुरू असताना या मजुरांना कामाचा अनुभव नव्हता. त्यामुळे ऊसतोड करणे जमत नव्हते. काम करता येत नसल्यामुळे मजुरीची रक्कमही मिळणे बंद झाले होते.

मजुरीची रक्कम मिळत नसल्याने उपासमार होऊ लागली. त्यामुळे वैतागलेले हे सर्व मजूर मध्य प्रदेशात परत पाठविण्याचा आग्रह धरत होते. परंतु त्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसेही नव्हते. मुकादमानेही या सर्व मजुरांना डांबून ठेवले होते.

दरम्यान, आपली अडचण संबंधित मजुरांनी मध्य प्रदेशातील कटनीच्या जिल्हाधिका-यांना कळविली. त्याची लगेचच दखल घेत कटनीच्या जिल्हाधिका-यांनी सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याशी संपर्क साधला. सातपुते यांनीही यासंदर्भात तेवढीच संवेदनशीलता दाखवत कंदलगाव येथे अडकलेल्या सर्व मजुरांना त्यांच्या गावी परत पाठविण्याची व्यवस्था केली.

विशेष बसमधून सर्व मजुरांना मध्य प्रदेशाच्या सीमेवर पाठविण्यात आले. त्यासाठी मुकादम तथा टोळी प्रमुख व ऊसतोड मजुरांमध्ये समन्वय घडवून प्रत्येक मजुराला दोन हजार रूपये मजुरीची रक्कम उपलब्ध केली गेली. शिवाय प्रवासात जेवण, सोलापुरी चादर, टॉवेल तसेच सॕनिटायझर व मुखपट्ट्या पुरविण्यात आल्या. मध्य प्रदेशाच्या सीमेवर तेथील प्रशासनाने सर्व मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्याची जबाबदारी पार पाडली.

तक्रार नसल्याने कारवाई नाही
मध्य प्रदेशातून सुमारे नऊशे किलोमीटर दूर अंतरावरून केवळ रोजगारासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात आलेल्या मजुरांना ऊसतोडीच्या कामाचा अनुभव नव्हता. त्यातून त्यांच्या अडचणी वाढल्या. गावी परत जाण्याची त्यांची मागणी होती. परंतु त्यांना तसेच डांबून ठेवण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी हस्तक्षेप केला असता विचारपूस करूनही संबंधित मजुरांनी कोणतीही तक्रार केली नाही. मूळ गावी परत जाणे हेच त्यांच्यासाठी महत्वाचे होते. तक्रारीअभावी पोलिसांना संबंधितांवर कायदेशीर कारवाई करता आली नाही.
-तेजस्वी सातपुते, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण