सोलापूरमधील सात वर्षीय आराध्याने तिच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत केली. चिमुकलीचा उल्लेख करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तिचं कौतुक केलं आहे. ‘आराध्याने महाराष्ट्रासमोर एक आगळंवेगळं उदाहरण ठेवलं आहे. जर ही समज सात वर्षांच्या मुलीमध्ये आली असेल तर आपण हे युद्ध जिंकलं समजा.. समजा नाही जिंकलंच,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उद्धव ठाकरे म्हणाले, “आज संपूर्ण देशात, राज्यात, शहरात लॉकडाउन आहे. लॉकडाउनच्या काळात सर्वजण संयम दाखवत आहेत. त्यात सोलापूरच्या आराध्याचा आज वाढदिवस आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने काही ना काही मदत करत असताना या चिमुकलीनेही खारीचा वाटा उचलला आहे. हे वय हट्ट करण्याचं आहे, लाड पुरवून घेण्याचं आहे, वाढदिवस साजरा करून घेण्याचा आहे. पण आराध्याने वेगळा आदर्श महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवला आहे.”

आणखी वाचा- दुहीचा व्हायरस पसरवणाऱ्यांना सोडणार नाही- मुख्यमंत्री

“ही आपल्या महाराष्ट्राची वृत्ती आणि ओळख आहे. आता मला खात्री आहे. जर ही समज सात वर्षांच्या मुलीमध्ये आली असेल तर आपण हे युद्ध जिंकलं समजा.. समजा नाही जिंकलंच. हा संयम, ही जिद्द, ही शिस्त आपल्याखेरीज कोणाकडे नाही हे सर्व जगाने मान्य केलंय”, असं ते पुढे म्हणाले.

याचसोबत उद्धव ठाकरेंनी आराध्याला तिच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छादेखील दिल्या.