सोलापूरमधील वाखरी तालुक्यात रोडरोमियोच्या जाचाला कंटाळून दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. संतप्त पालक आणि ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पोलिसांनी अज्ञात तरुणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

वाखरी तालुक्यातील आश्रमशाळेत दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने बुधवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करणारी मुलगी १६ वर्षांची आहे. रोडरोमियोच्या छेडछाडीला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी स्थानिक वृत्तवाहिनीला घटनेची सविस्तर माहिती दिली. ‘माझ्या मुलीची मंगळवारी अज्ञात मुलाने छेड काढली होती. त्या मुलाने माझ्या मुलीला चिठ्ठी दिली होती. ही बाब शाळेतील शिक्षकांना समजली होती. त्यांनी मला संध्याकाळी पाच वाजता फोन केला आणि शाळेत भेटायला बोलावले. मी कामावर असल्याने बुधवारी सकाळी शाळेत येतो असे त्यांना सांगितले होते’, अशी माहिती मुलीच्या वडिलांनी दिली.

बुधवारी सकाळी शाळेत गेल्यावर शिक्षकांनी त्यांना मुलीला एका मुलाने चिठ्ठी दिल्याचे सांगितले. त्यावर पीडित मुलीने ‘मी शाळेत जाणार नाही, ते लोक माझी रोज छेड काढतात’, असे सांगितले. माझी समाजात बदनामी झाली, असे तिचे म्हणणे होते. शिक्षकांनीही मुलीची चूक असल्याचे सांगितल्याने ती निराश झाली होती, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. तिथून घरी आल्यावर जेवण करुन मुलीचे वडील कामावर निघून गेले. घरी कोणीही नसताना मुलीने गळफास घेत आत्महत्या केली. रोडरोमियो फक्त माझ्याच मुलीला नव्हे तर गावातील अन्य मुलींनाही त्रास देतात, असे मुलीच्या वडिलांनी म्हटले आहे.

पालक आणि ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पोलिसांनी अज्ञात तरुणांविरोधात छेड काढणे तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.