शैलजा तिवले

राज्यात करोनाबाधित रुग्ण आणि मृतांची संख्या मुंबई जिल्ह्य़ात सर्वाधिक असली तरी, बाधितांच्या तुलनेत सर्वात जास्त मृत्यूदर सोलापूरमध्ये आहे. सोलापूरचा मृत्यूदर ७.९७ टक्के इतका आहे, तर मुंबईचा ५.६ टक्के आहे. ६,३५५ रुग्णसंख्या असलेल्या जळगावचा मृत्यूदरही मुंबईइतकाच आहे.

सोलापूर महानगरपालिकेत ३,५१४ करोनाबाधित रुग्ण असून ३१८ मृत्यू आहेत. सोलापूर ग्रामीण भागात ९५४ रुग्णांमागे ३९ मृत्यू नोंदविले गेले. जळगावमध्ये मात्र उलट चित्र आहे. जळगाव ग्रामीणमध्ये ४,७८९ रुग्णांमागे २९८ मृत्यू, तर जळगाव महानगरपालिकेत १५६६ रुग्णांमागे ६३ मृत्यू आहेत. राज्यात सोलापूर, मुंबई, जळगाव त्याखाली लातूर (४.८८ टक्के), धुळे (४.८४ टक्के), जालना (४.३३ टक्के) असा मृत्यूदर आहे.

मुंबईतील एकूण रुग्णसंख्येने ९५ हजारांचा टप्पा पार केला आहे. मृत्यूदरात मात्र गेल्या पंधरा दिवसांत घट झाली असून ५.८ टक्क्यांवरून ५.६ वर आला आहे.

भिवंडी महानगरपालिकेचा मृत्यूदर मुंबईपेक्षा अधिक म्हणजे ६ टक्के आहे. त्याखालोखाल ठाणे (३.८७ टक्के), नवी मुंबई (२.६७ टक्के) आणि ठाणे ग्रामीणमध्ये (२ टक्के) मृत्यूदर आहे.

दुप्पट रुग्णसंख्या..

मुंबई वगळता राज्यात इतर जिल्ह्य़ांमध्ये संसर्ग प्रसार झपाटय़ाने वाढत आहे. गेल्या पंधरा दिवसांत रुग्णसंख्या जवळपास दुप्पट झालेल्या जिल्ह्य़ांमध्ये ठाणे, पुणे, पालघर, रायगड, सांगली, सोलापूर, अहमदनगर, जळगाव, जालना, बीड, लातूर, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीचा समावेश आहे.

..अडचण काय?

करोनाबाबत मनात भीती असल्याने रुग्ण लक्षणे असूनही उपचारासाठी लवकर येत नाहीत किंवा घरीच उपचार घेतात. लक्षणे तीव्र झाल्यानंतरच रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहेत. तोपर्यत रुग्णांची प्रकृती अधिक गंभीर होते. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रात तपासणी, चाचण्यांवर भर देत रुग्णांचे वेळेत निदान करण्यावर भर देत आहोत. तसेच काही जिल्ह्यांमध्ये अजूनही खासगी रुग्णालये सहकार्य करत नाहीत. त्यामुळे शासकीय रुग्णालयांवरील ताण वाढत आहे. चाचणी क्षमता वाढविल्याने रुग्णसंख्या वाढत आहे. हे वेळेत उपचार होण्याच्या दृष्टीने चांगलेच असल्याचे आरोग्य आयुक्तालयाच्या संचालक आणि राज्याच्या मृत्यू विश्लेषण समितीच्या प्रमुख डॉ. साधना तायडे यांनी स्पष्ट केले.