करोनाच्या पार्श्वभूमीवर लागलेली टाळेबंदी शिथील होऊन मद्यविक्रीची घरपोच सेवा सुरू झाल्यानंतर दारू पिण्यासाठी आवश्यक परवाने मिळण्यासाठी सोलापुरातील सत्ताधारी भाजपाच्या एका नगरसेविकेनेच पुढाकार घेतला आहे. दारू पिण्यासाठी परवाने मिळण्याकरिता अमक्या एका ऑनलाइन सेवा केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहनही या नगरसेविकेने समाज माध्यमातून केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

सोलापूर महापालिकेतील, सत्ताधारी भाजपाचे पदाधिकारी, अधिकारी, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी व पत्रकार यांचा व्हॉट्सअॅप ग्रुप कार्यरत आहे. या व्हॉट्सॲप ग्रुपवर सत्ताधारी भाजपाच्या एका नगरसेविकेने दारू पिण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कायदेशीर परवाना उपलब्ध होण्याकरिता पुढाकार घेणारी पोस्ट टाकली आहे. दारू परवाना मिळण्यासाठी एका ऑनलाइन सेवा केंद्राच्या संपर्क क्रमांकासह दारू परवाना मिळण्यासाठी कोणकोणत्या बाबींची पूर्तता करावी लागते, याची माहिती देणारी पोस्ट चक्क एका नगरसेविकेनेच टाकल्यामुळे महापालिका वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आश्चर्य म्हणजे पालिका विषय समितीची माजी सभापती असलेली संबंधित नगरसेविका स्वतःला शिस्तबद्ध म्हणवून घेणाऱ्या भाजपाची सदस्या आहे. एकीकडे दारूची बाटली आडवी पाडण्यासाठी राज्यात महिलांकडून सातत्याने पुढाकार घेतला जात असताना दुसरीकडे सोलापुरात एका जबाबदार नगरसेविकेनेच दारू परवान्यासाठी पुढाकार घ्यावा, याबद्दल महिलावर्गातही नापसंती व्यक्त होत आहे.

सोलापूर महापालिकेत ५२ महिला लोकप्रतिनिधी आहेत. काही मोजक्याच नगरसेविकांचा अपवाद वगळता बहुतांशी नगरसेविकांचे पती, मुले, बंधू, दीर ही पुरूष मंडळीच महापालिकेत येऊन कामे करतात. दारूसाठी परवाना उपलब्ध होण्याकरिता समाज माध्यमावर पोस्ट टाकण्याचे कृत्य संबंधित नगरसेविकेऐवजी तिच्या पतीनेच केले असावे, असे बोलले जात आहे. मात्र, त्यासाठी वापरला गेलेला व्हॉट्सॲप संपर्क क्रमांक संबंधित नगरसेविकेच्या नावानेच असल्याचे महापालिका वार्षिक डायरीत नमूद आहे.