सोलापूरमधील बार्शी तालुक्यात संपत्तीच्या वादातून एकाने भावाचे घर पेटवून दिल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. यात चार जणांचा मृत्यू झाला असून घर जाळणारा संशयित देखील जखमी झाला आहे. राहुल कुरुंददास देवकाते (वय ३५), सुषमा देवकाते (वय२५), कस्तुराबाई देवकाते (वय ६५) आणि आर्यन राहुल देवकाते (वय २) अशी या मृतांची नावे आहेत. राहुल देवकाते हे उस्मानाबाद पोलीस दलात पोलीस शिपाई पदावर कार्यरत होते.
बार्शी तालुक्यातील खांडवी गावात राहणाऱ्या रामचंद्र देवकातेचे त्याचा लहान सख्खा भाऊ राहुलशी घर वाटणीवरुन वाद होता. हा वाद इतका टोकाला पोहोचला की गुरुवारी रात्री रामचंद्रने भावाचे कुटुंबच संपवले. गुरुवारी रात्री देवकाते कुटुंबीय जेवण करुन झोपले होते. रात्री एकच्या सुमारास रामचंद्र तिथे पोहोचला. त्याने राहुल यांच्या घराला पेटवून दिले. यात होरपळून राहुल, त्यांची पत्नी आणि मुलाचा मृत्यू झाला. तर त्यांची आई कस्तुराबाई या गंभीररित्या भाजल्या. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेत रामचंद्र स्वतःदेखील भाजला. त्याच्यावरही रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
राहुल देवकाते यांचा तीन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. घरातील भिंतीवर विवाहासाठी स्वागतासह भालदार- चोपदाराचे काढलेली चित्रे अजूनही दिसत असली तरी राहुलचा नवीन संसार मात्र संपला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 29, 2018 12:14 pm