करोनाचा प्रादुर्भाव असतानाही मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथे महालिंगराया यात्रेचं आयोजन करण्यात आलं. राज्यातील मंदिर आज सुरु झाली असली तरीही जमावबंदीचे आदेश कायम आहेत. शासनाच्या जमावबंदीचे आदेश झुगारुन येथील नागरिकांनी पालखी सोहळ्याचं आयोजन केलं. यात्रेतील अनियंत्रित गर्दी आणि करोनाच्या नियामांचा होणारा फज्जा पाहून पोलिसांनी अखेर लाठीचार्ज करत जमावाला पांगवलं. याप्रकरणी देवस्थान यात्रा समितीच्या पदाधिका-यांसह ७४ जणांविरूध्द मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

करोनाकाळात बंद असलेली देवस्थाने अखेर आठ महिन्यांनी खुली झाली असतानाच मंगळवेढा तालुक्यात हुलजंती येथे महालिंगराया यात्रेत जमावबंदीसह अन्य शासकीय नियम व अटींचे पालन न करता भाविकांच्या अनियंत्रित गर्दीत पालखी सोहळा होत असताना पोलिसांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करण्यात आले. वारंवार सूचना करून गर्दी कमी न होता पुन्हा वाढू लागल्यामुळे पोलिसांना त्यत हस्तक्षेप करावा लागला.

यात्रेत गावातील ओढ्यावर पालखी सोहळा होतो. महालिंगराया (हुलजंती), शीलवंती (उमरगा), बिरोबा (शिरढोण), विठोबा (सोन्याळ, ता. जत), जकराया (येणकी, ता. मोहोळ), बिराप्पा (जिरानकलगी) आदी गावांच्या ग्रामदैवतांच्या पालख्या भेटीसाठी येतात. यंदा करोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे यात्रेत शासनाच्या नियम व अटींचे पालन करण्याच्या सूचना पोलिसांनी यात्रा समितीला दिल्या होत्या. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. यात्रेत हजारो भाविक आले होते. परंतु त्यात सामाजिक अंतराचे पालन केले जात नव्हते. मुखपट्टीचाही वापर होत नव्हता. राष्ट्रीय साथीचे रोग प्रतिबंधक कायदा व साथनियंत्रण कायद्यासह मुंबई पोलीस अधिनियमाचा भंग केल्यामुळे पोलिसांना भाविकांच्या वाढलेल्या जमावाला पांगविण्यासाठी लाठीमार करावा लागला.