सोलापुरात करोनाग्रस्त रूग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना यात आता महापौर व त्यांच्या पतीलाही करोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. दोघांवरही एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
सोलापूरमध्ये करोनाबाधित ४० रूग्णांची नव्याने भर पडली असून त्यात महापौर व त्यांच्या पतीचाही समावेश असल्याचे समजताच महापालिका यंत्रणेत गोंधळ उडाला. दरम्यान, रेल्वे लाईन्समधील महापौर निवासासह महापौरांचे खासगी निवासस्थान व परिसर सॕनिटाइझ करण्यात आला आहे. महापौरांना अंगदुखीसह अशक्तपणा जाणवू लागला असता त्यांना तात्काळ रूग्णालयात हलविण्यात आले. त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता त्यांना करोनाची बाधा झाल्याचे दिसून आले. त्यांचे पतीलाही करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. कुटुंबीयांतील सर्व नऊ सदस्यांची करोनाशी संबंधित वैद्यकीय चाचणी केली असता महापौर व त्यांच्या पतीशिवाय अन्य सर्वांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले. महापौरांचे स्वीय सहायक यांचाही चाचणी अहवाल निगेटिव्ह आला.
दरम्यान, महापालिकेच्या तीन अधिकाऱ्यांसह १५ कर्मचाऱ्यांना करोनाबाधा झाली आहे. तसेच तीन नगरसेवकही करोनाबाधित झाले आहेत. महापालिकेत महापौरांनी करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी यापूर्वी आयोजिलेल्या काही आढावा बेठकांना हजर असलेल्या एका-दोघा अधिकाऱ्यांना करोनाबाधा झाली होती. त्यांच्या संपर्कातून करोनाचा शिरकाव महापौर बंगल्यातही झाला आणि महापौर व त्यांच्या पतीलाही त्याचा फटका बसला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 3, 2020 3:40 pm