जुन्या लोकलला अद्याप मुहूर्त नाही
मुंबईतील बंद झालेली जुनी लोकल रेल्वेगाडी सोलापूर-मिरज-सोलापूर मार्गावर दैनंदिन स्वरूपात सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने जाहीर करूनही त्यास अद्यापि मुहूर्त लागला नसतानाच आता दुसरीकडे बुधवारपासून सोलापूर-मिरज-सोलापूर या पॅसेंजर गाडीची सेवा अनिश्चित काळासाठी थांबविण्यात आली आहे.
सोलापूर रेल्वेस्थानकाहून दररोज सकाळी सहा वाजता सोलापूर-मिरज पॅसेंजर गाडी सुटत असे. या गाडीला प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद मिळायचा. त्यामुळे या गाडीला रेल्वे प्रशासनाने दोन वेळा मुदतवाढ दिली होती. परंतु, या पाश्र्वभूमीवर अचानकपणे पॅसेंजर गाडीची सेवा अनिश्चित काळासाठी थांबवण्यात आली आहे. ही सेवा थांबवण्यामागचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. या अगोदर मुंबईत कालबाहय़ ठरलेली लोकल गाडी सोलापूर-मिरज-सोलापूर दरम्यान सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार गेल्या २० एप्रिल रोजी या लोकल गाडीच्या सेवेचा मुहूर्तही ठरला होता. परंतु प्रत्यक्षात तो मुहूर्त लांबला आहे. आता सोलापूर-मिरज पॅसेंजर सेवाही खंडित करण्यात आल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.