लोकसत्ता ऑनलाइन, सोलापूर
गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाबरोबर मोहरम उत्सव एकत्र साजरा होत आहे. देशात मोहरम उत्सवाची वेगवेगळी परंपरा आहे. सोलापुरातील मोहरम उत्सवाच्या विशिष्ट परंपरेत सुमारे तीनशे वर्षे जुन्या पीर मंगलबेडा (अहले हरम) सवारीसह अन्य काही सवारी, ताबुतांना मानाचे स्थान आहे. अठरापगड जातींच्या सहभागातून साजरा होणाऱ्या मोहरम उत्सवात गाववाडा संस्कृतीचे दर्शन घडते.
सोलापुरात सुमारे २६५ सवारी, ताबूत, डोल्यांची प्रतिष्ठापना होते. गेले सहा दिवस विविध मानाच्या पंजांच्या मिरवणुका निघाल्या होत्या. मंगळवारी मोहरमच्या ‘शहादत’दिनी पीर बडा मंगलबेडा (अहले हरम) सवारीची मिरवणूक मंगलमय वातावरणात निघाली. ज्येष्ठ संस्कृत पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार व कवी बदऊज्जमा बिराजदार यांनी धार्मिक विधी पूर्ण केल्यानंतर पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक चौपाडात पोहोचल्यानंतर थोरला मंगळवेढा तालीम गणेशोत्सव मंडळाच्या गणपती मंडपातून पीर मंगलबेडा सवारीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. शिवसेनेचे नगरसेवक अमोल शिंदे, शैलेश पिसे, सुनील शेळके, प्रकाश अवस्थी, पृथ्वीराज दीक्षित, उज्ज्वल दीक्षित आदींनी ही सेवा रुजू केली. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्यासह महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य ॲड. मिलिंद थोबडे, मुंबई उच्च न्यायालयातील फौजदारी वकील जयदीप माने आदींच्या उपस्थितीत मिरवणुकीचा समारोप करण्यात आला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 10, 2019 5:14 pm