सोलापूर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना वेतन अदा करण्यासाठी पुरेशी रक्कम शिल्लक नसल्याने या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी कर्मचारी संघटनेने आंदोलन केल्यानंतर, शुक्रवारी पालिका प्रशासनाने कर्मचाऱ्यांचे वेतन अदा केले. परंतु त्यासाठी युजर चार्जेस वसुलीपोटी जमा असलेली साडेसहा कोटींची ठेव मोडावी लागली.  पालिका कर्मचाऱ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. त्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी काल गुरूवारी पालिका आवारात ठिय्या आंदोलन केले होते. दुपारनंतर पालिका प्रशासनाने आश्वासन दिल्यानंतर तेथील कामकाज पूर्ववत सुरू झाले होते.

या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने शुक्रवारी ठरल्याप्रमाणे कर्मचाऱ्यांचे वेतन अदा केले. मात्र त्यासाठी मिळकतदारांकडून युजर चार्जेस म्हणून जमा झालेली सहा कोटी ५० लाखांची ठेव मोडावी लागली. या मोडलेल्या ठेवीतून ५४०० कर्मचाऱ्यांना वेतन अदा करण्यात आले. सध्या पालिकेची स्थिती नाजूक बनली आहे.  दरम्यान, शुक्रवारी मुंबईत महापालिकेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन महापालिकेची आर्थिक चणचण सोडविण्यासाठी त्यांना साकडे घातले.

थकीत एलबीटी अनुदान शासनाकडून वेळेवर मिळत नाही, त्यामुले कर्मचाऱयांना त्यांचे नियमित वेतन अदा करणे कठीण झाल्याचे महापौर शोभा बनशेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख यांच्यासह उपमहापौर शशिकला बत्तुल, पालिका सभागृह नेते सुरेश पाटील, स्थायी समितीचे सभापती संजय कोळी, पालिका आयुक्त विजय काळम आदी उपस्थित होते. मात्र यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी कशा प्रकारे दिलासा दिला, हे समजू शकले नाही.