सोलापूर महापालिका निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच रविवारी प्रचाराची सांगता होण्यापूर्वी राष्ट्रवादी व एमआयएम या दोन पक्षांचे समर्थक समोरासमोर येऊन भिडले. यात हाणामारी होऊन राष्ट्रवादीच्या उमेदवारासह चौघेजण जखमी झाले. सकाळी साडेअकराच्या सुमारास नई जिंदगी चौकात हा प्रकार घडला. या घटनेनंतर या भागात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
प्रभाग क्रमांक २१ मध्ये नई जिंदगी चौकाचा परिसर मुस्लिमबहुल भाग समजला जातो. याठिकाणी एमआयएमचे जिल्हा प्रभारी तौफिक शेख हे उभे असून त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक, माजी उपमहापौर हारून सय्यद यांनी कडवे आव्हान उभे केले आहे. तौफिक शेख हे ‘बाहुबली’ नेते म्हणून गणले जातात. या दोन्ही उमेदवारांच्या पदयात्रा फिरत असताना अमन चौकात समोरासमोर येऊन भिडल्या. त्यातून एकमेकांच्या विरोधात तुफान घोषणाबाजी होऊन गोंधळ सुरू झाला. नंतर काही क्षणात हाणामारी झाली. यात राष्ट्रवादीचे उमेदवार हारून सय्यद यांच्यावर हल्ला झाला. दगड-विटांसह लाकडांनी झालेल्या हाणामारीत सय्यद दोन्ही पक्षांचे पाच कार्यकर्ते जखमी झाले. दरम्यान, या घटनेनंतर तातडीने पोलीस दाखल झाले. जखमी कार्यकर्त्यांना छत्रपती शिवाजी सर्वोपचार शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रूग्णालयातही पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता.
इम्रान कलीम शेख (वय ३५ रा़ सिध्देश्वर नगर, सोलापूर), सादिक चाँद शेख (वय ४५ रा. लोकमान्य नगर, सोलापूर), आसिफ फरीद शेख (वय ३५ रा. सिध्देश्वर नगर, सोलापूर), जावेद मुस्तफा कल्याणी (वय २८ रा. साईनाथ नगर, सोलापूर) अशी गंभीर जखमींची नावे आहेत.