News Flash

सोलापूर : विडी कारखाने सुरू होण्यात अडथळ्यांची शर्यत

अडीच महिने रोजगार बंद असल्यामुळे हजारो विडी कामगारांची प्रचंड आर्थिक कोंडी

करोनाच्या वाट्याला आलेली टाळेबंदी हळूहळू शिथील होत असताना सोलापुरात सुमारे ७० हजार महिला विडी कामगारांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन असलेला विडी उद्योग सुरू होण्यास अजूनही अडथळ्यांची शर्यत चालू आहे. त्यामुळे कामगारवर्ग प्रचंड अस्वस्थ आहे.

शहरात पूर्व आणि दक्षिण भागात प्रामुख्याने विडी उद्योग चालतो. याच परिसरात दाटीवाटीच्या झोपडपट्ट्यांमध्ये गरीब विडी महिला कामगार राहतात. परंतु याच परिसरात करोना विषाणूचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे याच भागात प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या अधिक आहे. प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये अजूनही बरीच बंधने असून ती शिथील होण्यास अडचणी आहेत. शहरात विडी कारखान्यांची संख्या १५ आहे. हे कारखाने विखुरलेले आहेत.

टाळेबंदी शिथील होऊन उद्योग व्यवसाय नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अटीवर सुरू होत आहेत. त्याप्रमाणे विडी उद्योगही सुरू व्हावा, अशी समस्त विडी महिला कामगारांची मागणी आहे. गेले अडीच महिने रोजगार बंद असल्यामुळे हजारो गोरगरीब महिला विडी कामगारांची प्रचंड आर्थिक कोंडी झाली आहे. त्यांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन विडी उद्योगच आहे. त्यामुळे आपला उदरनिर्वाह पुन्हा सुरळीतपणे चालण्यासाठी विडी उद्योग केव्हा सुरू होणार, याकडे तमाम विडी कामगारांच्या नजरा खिळून आहेत.

दरम्यान, विडी कामगारांचे प्रमुख संघटन असलेल्या ‘सिटू’ या प्रश्नावर आंदोलन हाती घेतले असता, महापालिका प्रशासनाने कठोर अटी व नियम लादून विडी उद्योग सुरू करण्याची मुभा दिली आहे. या अटी व नियम अतिशय जाचक असल्यामुळे त्यास विडी कारखानदारांसह संपूर्ण कामगारांनी विरोध केला आहे. विडी कारखानदारांनी विडी कामगारांना कच्चा माल देण्यासाठी व तयार विड्यांचा माल स्वीकारण्यासाठी स्वतःच्या कारखान्यात बोलावू नये. तर प्रत्येक कामगाराच्या घरी जाऊन कच्चा माल द्यावा आणि तयार विड्यांचा माल स्वीकारावा, हे पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी घातलेले बंधन पाळणे अशक्य असल्याचे कारखानदार व विडी कामगारांना वाटते. बंधने शिथील करावीत म्हणून ‘सिटू’चे नेते, माजी आमदार नरसय्या आडम यांनी आक्रमक आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे.

या पार्श्वभूमीवर गुरूवारी पालिका आयुक्त शिवशंकर यांनी विडी उद्योग सुरू करण्याची परवानगी देताना जारी केलेल्या आदेशात ४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या विडी कामगारांना कच्चा माल घ्यायला आणि तयार माल द्यायला विडी कारखान्यात जाण्यास मज्जाव केला आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील विडी कामगारांना कारखान्यात जाता येणार नाही. कारखान्यात दोन कामगारांना किमान आठ फुटाचे अंतर ठेवावे लागेल. प्रत्येक कामगाराला मुखपट्टी व हातमोजे कारखानदाराने उपलब्ध करून द्यायचे आहे. कारखान्यात येणाऱ्या कामगारांचे सीसीटीव्हीद्वारे चित्रिकरण करून त्याचे संपूर्ण फुटेज महापालिका प्रशासनाकडे द्यावे लागेल, अशी बंधने घालण्यात आली आहेत. परंतु ४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कामगारांना कारखान्यात जाणे-येण्यास मज्जाव केला तर ७० हजारांपैकी ४० हजार कामगारांना रोजगारच मिळणार नाही, असा आक्षेप नरसय्या आडम यांनी घेतला आहे. प्रशासनाबरोबर विडी कामगारांनी तीव्र संघर्ष करण्याची तयारी सुरू केली आहे. काही कामगारांनी आपल्या स्वतःच्या घरीच उपोषणही सुरू केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2020 7:24 pm

Web Title: solapur obstacle race in starting bidi factory msr 87
Next Stories
1 शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट; सरकारला केल्या महत्त्वाच्या सूचना
2 सोलापूर : बाजार समितीत कांद्याचे दर आणखी कोसळले
3 कोकणाला मागच्या नऊ दिवसांत कोणतीही मदत मिळालेली नाही-फडणवीस
Just Now!
X