कर्नाटकातील विजापुरात राहणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यां रेशमा पडेकनूर (वय ४१) यांचा आर्थिक देवाणघेवाणीच्या कारणावरून खून केल्याप्रकरणी एमआयएम सोलापूर शाखेचा अध्यक्ष तथा बाहुबली नगरसेवक तौफिक शेख याच्यासह दोघांना कर्नाटक पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. गेल्या १७ मे रोजी झालेल्या खुनाची कबुली तौफिक शेख याने दिल्याची माहिती विजापूरचे पोलीस अधीक्षक प्रकाश अमृत निकम यांनी दिली.

तौफिक इस्माईल शेख (वय ५०, रा. रेल्वे लाईन्स, सोलापूर) याच्यासह त्याचा साथीदार एजाज बंदेनवाज बिरादार (वय २८, रा. इंडी, जि. विजापूर) यालाही अटक करण्यात आली आहे. तर या गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आलेल्या अन्य दोघांची कसून चौकशी केली जात आहे. तौफिक शेख हा पोलीस दस्तनोंदीनुसार सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध गंभीर स्वरूपाचे ३० गुन्हे नोंद आहेत. यात खून, खुनीहल्ला, खंडणीची मागणी, अपहरण, दंगल, मारामारी, धमकावणे आदी गुन्ह्य़ांचा समावेश आहे. त्याला यापूर्वी सोलापूर शहर पोलिसांनी एमपीडीए कायद्याखाली स्थानबध्दही केले होते. तर त्याचा साथीदार एजाज बिरादार हादेखील सराईत गुंड असून त्याच्यावरही बरेच गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Congress, Tribute, Ashok Chavan, wardha congress committee
अशोक चव्हाण यांना श्रद्धांजली? काँग्रेस कार्यालयात धक्कादायक…
Baramati Namo MahaRojgar Melava
बारामतीमधील शासकीय कार्यक्रमासाठी शरद पवारांना पहिल्यांदा डावललं; सुप्रिया सुळे म्हणाल्या…
narendra modi and sharad pawar
काँग्रेसच्या काळात एका रुपयाचे  १५ पैसे व्हायचे, आता मी एक बटण दाबले आणि…; पंतप्रधान माेदींकडून शरद पवार यांचे नाव न घेता टीका
Social workers detained yavatmal
आंदोलनाची दहशत… मोदींच्या सभेपूर्वीच सामाजिक कार्यकर्ते स्थानबद्ध

विजापूरचे पोलीस अधीक्षक प्रकाश निकम यांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली. मृत रेशमा बंदेनवाज पडेकनूर या विजापुरातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यां होत्या. त्यांची सोलापूरच्या तौफिक शेख याजबरोबर ओळख होती. त्यातून त्यांच्यात आर्थिक व्यवहारही झाले होते. रेशमा पडेकनूर यांनी तौफिक शेख यास हात उसने म्हणून १३ लाखांची रक्कम दिली होती. मुदत टळून गेल्यानंतर ही रक्कम परत करण्यास शेख हा टाळाटाळ करू लागला. त्यामुळे त्यांच्यात वैमनस्य आले होते. दरम्यान, गेल्या १७ एप्रिल रोजी पडेकनूर सोलापुरात आल्यानंतर त्यांच्याशी तौफिक शेख याची भेट झाली.

एका हॉटेलात शेख याने रेशमा यांच्याशी गैरवर्तन करून त्यांना लोकसभा निवडणुकीत खर्चासाठी खंडणीची मागणी केली. त्या वेळी त्याने स्वत:चे रिव्हॉल्व्हर रेशमा यांच्या कानपटीवर लावून खुनाची धमकी दिली होती. तशा आशयाची फिर्याद त्यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात नोंदविली होती. तर त्याचवेळी तौफिक शेख याच्या पत्नीनेही रेशमा कडेकनूर यांच्याविरूध्द परस्परविरोधी फिर्याद दिली होती. तेव्हापासून तौफिक शेख हा पोलिसांना सापडत नव्हता. पुढे १७ मे रोजी रेशमा पडेकनूर यांचा मृतदेह कोलार येथे कृष्णा नदीच्या पुलाखाली आढळून आला. हा खुनाचा प्रकार होता. हा खून तौफिक शेख व त्याच्या साथीदारांनी केल्याची फिर्याद मृत रेशमा यांचे पती बंदेनवाज कडेकनूर यांनी कोलार पोलीस ठाण्यात नोंदविली होती. त्यानुसार कर्नाटक पोलिस तौफिक शेख व त्याच्या साथीदारांच्या मागावर होते. अखेर तौफिक शेख हा रविवारी सोलापूर-विजापूर महामार्गावर कर्नाटक सीमेवर धुळखेड येथे  सापडला. त्याला सोमवारी दुसऱ्या दिवशी अटक करण्यात आली. मंगळवारी त्याला न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करून १४ दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक निकम यांनी सांगितले.