वर्षभर शेतात राबून अन्न पिकविणाऱ्या शेतकऱ्यांनी बुधवारी वेळा अमावास्येनिमित्त आपापल्या शेतात काळय़ा आईचे पूजन करून कृतज्ञतेचा भाव व्यक्त केला. यानिमित्ताने सोलापूर जिल्हय़ातील ग्रामीण भागात प्रत्येक शेतामध्ये वनभोजनाचे कार्यक्रम झाले. ग्रामीण संस्कृतीची परंपरा जपणाऱ्या वेळा अमावास्येची पर्वणी सायंकाळी उशिरापर्यंत पाहावयास मिळाली.

कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या सोलापूर जिल्हय़ासह शेजारच्या उस्मानाबाद, लातूर या भागांत मार्गशीर्ष अमावास्या म्हणजेच ‘वेळा अमावास्या’ मोठय़ा प्रमाणात साजरी केली जाते. ही अमावास्या दर्शवेळा अमावास्या म्हणूनही ओळखली जाते. मूळ कर्नाटकातून चालत आलेली ही ग्रामीण संस्कृती परंपरा तेवढय़ाच उत्साही वातावरणात पाळली जाते. मूळ कानडी शब्द ‘येळ्ळ अमावास्या’ म्हणजे शेतातील पिकांच्या पेरणीनंतर येणारी सातवी अमावास्या होय. येळ्ळ अमावास्येचा अपभ्रंश होऊन वेळा अमावास्या हा शब्द रूढ झाला आहे.

या दिवशी सकाळी लवकरच शेतकरी आपल्या कुटुंबकबिल्यासह शेताकडे जातात. आदल्या दिवशीच कडब्यापासून तयार केलेल्या कोपीमध्ये शेतात असलेल्या सर्व पिकांची व मातीपासून बनविलेल्या पाच पांडवांची (पंचमहाभूते) पूजा करतात. एका रंगविलेल्या मातीच्या माठामध्ये ‘अंबिल’ हा खास द्रवपदार्थ भरून त्याचा नैवेद्य त्या ग्रामदैवताला दाखवला जातो. ज्वारी व बाजरीचे उंडे, आंबट भात, सर्व प्रकारच्या भाज्यांपासून तयार केलेली ‘भज्जी’, खीर आणि अंबिल अशा एक ना अनेक खाद्यपदार्थाचा नैवेद्य तयार करून ग्रावदैवताला दाखवला जातो. काळय़ा आईचे पूजन करताना शेतकऱ्यांच्या मनी कृतज्ञतेचा भाव असतो. बनवलेल्या या सर्व खास पदार्थाचा महाप्रसाद म्हणून सामूहिक वनभोजनाच्या रूपाने आस्वाद घेतला जातो. शेतातील बांधावर विशाल हिरव्या झाडाखाली वनभोजनाच्या पंगती उठत असतात. त्यासाठी एकमेकांना वनभोजनासाठी प्रेमाने आमंत्रणे दिली जातात. ज्यांची शेती नाही, अशा नातेवाईक व मित्रमंडळींना वनभोजनासाठी आवर्जून बोलावले जाते. शहरी भागातील नागरिकांसाठी तर वेळा अमावास्या म्हणजे जणू पर्वणीच असते.

सोलापूर जिल्हय़ात उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मंगळवेढा, मोहोळ आदी भागांत वेळा अमावास्येची पर्वणी विशेषत्वाने दिसून आली. शेतकऱ्यांचे निसर्गाशी असलेले नाते अधिक दृढशाली करणाऱ्या वेळा अमावास्येचा उत्सव आहे. शेतात उगवलेल्या रंगीबेरंगी फुलांसह नटलेला करडा, कापणीसाठी आलेली तूर, परिपक्व होऊ लागलेला हरभरा, वाऱ्याशी खेळत नाचणारा गहू, पाखरांना खुणावणारी पोटऱ्यातील ज्वारी असा चोहीकडे दिसणारा हिरवागार आणि प्रसन्न निसर्ग अतिशय लोभसवाणा ठरतो. त्याच वेळी वर्षभर ऊन, वारा, पाऊस अशा वातावरणात काळय़ा मातीत घाम गाळून पिकांची पैदास करणाऱ्या शेतकऱ्याची निसर्गाशी असलेल्या नात्याची वीण अधिक घट्ट होते.