सोलापूर, लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूरात बेकायदा सावकारी व्यवसायासह इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग असलेल्या सोलापुरातील शिवसेना नगरसेवक लक्ष्मण यल्लप्पा जाधव (५४) यांना शहराचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशानुसार एमपीडीए कायद्याखाली स्थानबध्द करण्यात आले आहे. त्यांची रवानगी पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. शहरातील सेटलमेंट, रामवाडी भागातून शिवसेनेतर्फे निवडून आलेला नगरसेवक लक्ष्मण जाधव यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्यांच्यावर फौजदार चावडी व सलगर वस्ती पोलीस ठाण्यात विविध स्वरूपाचे ११ गंभीर गुन्हे नोंद आहेत. यात बेकायदा सावकारी व्यवसाय करणे, कर्जवसुलीसाठी धमकावणे, खुनाचा प्रयत्न करणे, अप्रत्यक्ष खून व आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे, शस्त्रांचा धाक दाखवून खंडणी मागणे, दंगली करणे आदी गुन्ह्यांचा समावेश आहे.

नुकतेच शहरातील हांडे प्लाटमध्ये राहणाऱ्या एका ऑर्केस्ट्राबारचालकाचा कर्ज वसुलीसाठी सातत्याने छळ केल्यामुळे त्याने स्वतःच्या पत्नीसह दोन्ही मुलांचा खून करून स्वतः आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी नगरसेवक लक्ष्मण जाधव याच्यासह अन्य साथीदारांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. नगरसेवक जाधव याचा मुलगा विकास ऊर्फ विकी जाधव याच्यावरही गंभीर स्वरूपाचे गुन्हे असून त्याला तडीपार करण्यात आले आहे. तर त्याची पत्नी तिपव्वा ऊर्फ शारदा हिच्यावर कर्नाटकातील शिमोगा येथे जबरी चोऱ्या केल्याचा गुन्हा नोंद आहे. अवैध सावकारी व्यवसायात नगरसेवक जाधव यांच्यासह साथीदार असलेला दशरथ मधुकर कसबे (वय ४५) याच्यावरही तिसऱ्यांदा एमपीडीएची कारवाई करण्यात आली आहे.