शिवसेनेचे माजी मंत्री तथा सोलापूर जिल्याचे संपर्क प्रमुख तानाजी सावंत यांच्या विरोधात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची खप्पामर्जी होऊन त्यांचे पंख छाटताना नव्याने जिल्हा प्रमुखाचा प्रभारी पदभार ज्यांच्याकडे सोपविण्यात आले, त्या पुरूषोत्तम बरडे यांच्या स्वागत मिरवणुकीत चक्क चलनी नोटांची उधळण झाली. त्यामुळे बरडे हेदेखील अडचणीत आले आहेत.

प्रभारी जिल्हा प्रमुखपदी बरडे यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या स्वागत तथा अभिनंदनाचे डिजिटल फलक उभारतानाही त्यावर ‘तुमचा बाप आला’ असा मजकूर नमूद केल्याने सेनेतील एकमेकांना डिवचण्याचा प्रकार सुरूच असल्याचे दिसून आले. याबाबत टीका सुरू होताच काही डिजिटल फलकांवरील ‘बाप आल्या’चा मजकूर काढून त्याऐवजी ‘शिवसेनेचा वाघ आल्या’चा सुधारित मजकूर चिकटविण्यात आल्याचे दिसून आले. परंतु फलकबाजीचा हा चर्चेचा विषय झाला आहे. यापूर्वी प्रा. सावंत यांना ‘खेकड्या’ची उपमा देत ‘सोलापूर व उस्मानाबादची शिवसेना पोखरणा-या खेकड्याच्या नांग्या ठेचा’ अशा मजकुराची फलकबाजी करण्यात आली होती. त्यानंतर आता सावंतविरोधातील नवे प्रभारी जिल्हा प्रमुख बरडे यांच्या समर्थकांनीही पक्षांतर्गत विरोधकांना डिवचण्याच्या हेतूने बरडे यांच्या नियुक्तीवर ‘तुमचा बाप’ आल्याची फलकबाजी चालविल्यामुळे सेनेतील वाद आणखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

याच पार्श्वभूमीवर नवे प्रभारी जिल्हा प्रमुख झाल्यानंतर पुरूषोत्तम बरडे यांचे सोलापुरात प्रथमच आगमन झाले, तेव्हा त्यांच्या समर्थकांनी त्यांचे जुन्या पुणे चौत्रा नाक्यावर छत्रपती संभाजी पुतळ्याजवळ जंगी स्वागत केले. नंतर त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. परंतु या मिरवणुकीत बरडेप्रेमी शिवसैनिकांनी चक्क नोटांची उधळण केली. यात वेगळ्याच संस्कृतीचे दर्शन घडल्यामुळे आता निष्ठावंत शिवसैनिक कोणाला म्हणायचे, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

दरम्यान, यासंदर्भात नंतर बोलताना बरडे यांनी आपल्या स्वागत मिरवणुकीत नोटांची उधळण होताना आपण स्वतः पाहिले नाही. आमचे शिवसैनिक नोटांची उधळण करणारे नाहीत तर शिवछत्रपतींचा भगवा डौलाने उंच फडकावणारे आहेत. तरीही कोणी नोटांची उधळण केली असेल तर हा आपल्या बदनामीचे षडयंत्र असू शकते, असा खुलासा केला आहे. तसेच स्वागतासाठी उभारलेल्या डिजिटल फलकांवर ‘बाप आल्या’चा मजकूर नमूद करण्यात आल्याबद्दल बरडे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.