31 March 2020

News Flash

यात्रा नियोजन आराखडय़ाचा वाद चिघळला

यात्रेत कोणत्याही प्रकारचे आदेश न पाळता जिल्हाधिकारी मुंढे यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेण्यात आला.

सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिध्देश्वर यात्रेचा नियोजन आराखडा तयार करून तो शासन नियमाप्रमाणे अमलात आणण्यावरून जिल्हा प्रशासन आणि सिध्देश्वर मंदिर समिती यांच्यातील वाद टोकाला गेला आहे.जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या विरोधात मंदिर समितीच्या मदतीसाठी सत्ताधारी व विरोधकांसह सर्वपक्षीय मंडळींनी एकत्र येऊन येत्या सोमवारी ‘सोलापूर बंद’ पुकारला आहे.

गेल्या वर्षभरातील आपल्या कार्यकाळात मुंढे यांनी कायद्याची अंमलबजावणी करताना हितसंबंधी राजकीय पुढारी आणि काही लोकप्रतिनिधींना जुमानले नाही. परंतु कामाचा धडाका पाहता दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच जिल्हाधिकारी मुंढे यांच्या पाठीशी आहेत. त्यामुळे हितसंबंध दुखावूनसुध्दा मुंढे यांच्या विरोधात आवाज उठविण्याची सोय नव्हती. विशेषत यात ‘सांगताही येईना आणि सहनही होईना’ अशी पालकमंत्री देशमुख यांची मोठी अडचण झाली आहे. या पाश्र्वभूमीवर अखेरीस ग्रामदैवत सिध्देश्वर यात्रेच्या नियोजन आराखड्यावरून तापलेल्या वातावरणात लाभ उठवून जिल्हाधिकारी मुंढे यांची गच्छंती करण्याचा डाव हितसंबंधी पुढाऱ्यांनी आखल्याचे हालचालीवरून दिसून येते. शनिवारी दुपारी सिध्देश्वर मंदिरात मंदिर समितीच्यावतीने सिध्देश्वर भक्तांची बठक बोलावण्यात आली होती. यात्रेतील प्रमुख मानकरी असलेले सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख यांनी या बठकीत जिल्हाधिकारी मुंढे यांच्या कार्यपध्दतीविषयीची आपल्या मनात गेल्या वर्षभरात साचलेली खदखद प्रथमच उघड केली. याचवेळी मुंढे यांच्या विरोधात सिध्देश्वर यात्रेत शासनाने हस्तक्षेप करू नये म्हणून विश्व िहदू परिषदेसह बजरंग दल, िहदू धर्म जागृती समिती आदी संघ परिवारातील विविध संघटना रस्त्यावर उतरणार असल्याचे वििहपचे लक्ष्मण महाराज चव्हाण यांनी जाहीर केले. याचवेळी विजापूर वेशीतील नावाजलेल्या मक्का मशिदीचे मुफ्ती युसूफसाहेब यांनीही यात्रेच्या रूपाने धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप नको म्हणून सिध्देश्वर मंदिर समितीच्या आंदोलनात मुस्लीम समाजबांधवही उतरतील, असे घोषित केले.

हजारापेक्षा अधिक सिध्देश्वर भक्तांच्या उपस्थितीत झालेल्या या बठकीत मंदिर समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी सिध्देश्वर यात्रेत जिल्हाधिकारी मुंढे हे या ना त्या कारणावरून कशी आडकाठी घालतात, याविषयीचे गाऱ्हाणे मांडले. काँग्रेसचे आमदार सिध्दाराम म्हेत्रे, माजी आमदार नरसय्या आडम मास्तर, विश्वनाथ चाकोते, अक्कलकोटचे माजी आमदार महादेव पाटील, शिवशरण पाटील यांच्यासह काँग्रेसचे प्रदेश सचिव धर्मा भोसले, भाजपचे शहराध्यक्ष प्रा. अशोक िनबर्गी, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक पुरूषोत्तमबरडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, उपमहापौर प्रवीण डोंगरे, पालिका स्थायी समितीचे सभापती पद्माकर काळे, पालिका सभागृह नेते संजय हेमगड्डी, तसेच वीरशैव िलगायत समाजातील विविध मठांचे शिवाचार्य या बठकीस प्रामुख्याने उपस्थित होते.

सिध्देश्वर यात्रेसाठी नियोजन आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्यावरून जिल्हाधिकारी मुंढे व सिध्देश्वर मंदिर समितीने एकमेकांच्या विरोधात टोकाची भूमिका घेतली आहे. सुमारे पाच लाख भाविकांच्या गर्दीने फुलणाऱ्या या यात्रेत धुळीचे प्रदूषण रोखण्यासाठी होम मदानावर चटई अंथरावी आणि आपत्कालीन संकट व्यवस्थापनाचा भाग म्हणून नुकताच मार्केट पोलीस चौकी-होम मदान ते हरिभाई देवकरण प्रशालेपर्यंत नुकताच तयार केलेला पर्यायी रस्ता मोकळा ठेवावा, या दोन मुद्यांवर वाद चिघळला आहे. नियोजन आराखड्याप्रमाणे शासन नियमांचे पालन होणार नसेल तर मंदिर समितीच्या विरोधात फौजदारी कारवाई करावी लागेल, असा इशारा जिल्हाधिकारी मुंढे यांनी दिला आहे. परंतु या प्रश्नावर मंदिर समितीनेही जिल्हाधिकारी मुंढे यांचा कोणताही आदेश मानायचा नाही आणि नऊशे वर्षांच्या परंपरेनुसार आपल्या पध्दतीने यात्रा भरविण्याचा निर्धार केला आहे. यात जिल्हाधिकारी मुंढे यांच्या कार्यपद्धतीचा निषेध नोंदवून येत्या सोमवारी ‘सोलापूर बंद’ ची हाक दिली आहे. त्यामुळे एकीकडे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची चिन्हे दिसत असताना दुसरीकडे मुंढे यांच्यामुळे हितसंबंध दुखावलेल्या राजकीय पुढाऱ्यांना सिध्देश्वर मंदिर समिती तथा सिध्देश्वर भक्तांनी पुकारलेल्या संघर्षांच्या रूपाने आयते कोलीत सापडल्याचे मानले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2015 4:17 am

Web Title: solapur strike on monday from siddheshwar temple
टॅग Solapur
Next Stories
1 सांगलीतील जि.प. पेपरफुटीमध्ये उच्च पदस्थ अधिका-यांचा सहभाग
2 कॉपी करण्यास मज्जाव; प्राध्यापकाला मारहाण
3 सांगली महापालिका क्षेत्रात १८० अनधिकृत धार्मिक स्थळे
Just Now!
X