काश्मीरमधील पुलवामा भागात दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले सीआरपीएफ जवान सुनील दत्तात्रय काळे यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे व सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे तिघे आज बार्शी तालुक्यातील पानगाव येथे धावून आले. काळे कुटुंबियांतील एका पदवीधर व्यक्तीला शासकीय नोकरी आणि कुटुंबाला आर्थिक आधार देण्याचे आश्वासन या तिन्ही मंत्र्यांनी दिले.

गेल्या २३ जून रोजी पुलवामामध्ये दहशतवाद्यांशी लढताना सीआरपीएफचे जवान सुनील काळे (वय ४१) यांना वीरमरण आले होते. बार्शी तालुक्यातील पानगाव येथे त्यांच्या शोकाकुल कुटुंबियांच्या भेटीसाठी गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे व पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे आले. यावेळी वीरमाता कुसुम, वीरपत्नी अर्चना यांच्यासह शहीद सुनील काळे यांची मुले श्री आणि आयुष तसेच बंधू नंदकुमार यांचे तिन्ही मंत्र्यांनी सांत्वन केले आणि त्यांची कौटुंबिक माहिती जाणून घेतली.

शहीद सुनील काळे यांचा कुटुंबीयांना एकमेव आधार होता. या कुटुंबाला आता शासनाचा आधार हवा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. त्यावर बोलताना देशमुख व टोपे यांनी, सुनील काळे यांच्या हौतात्म्याचा कोणालाही विसर पडणार नाही. त्यांच्या पश्चात काळे कुटुंबीयांच्या पाठीशी शासनाचा भक्कम आधार राहील, अशी ग्वाही दिली. कुटुंबातील एका पदवीधर व्यक्तीला खास बाब म्हणून शासकीय नोकरी उपलब्ध करून देण्याबरोबरच अन्य आर्थिक आधार मिळवून देऊ, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी नमूद केले.