करोना विषाणूने भयग्रस्त केलेल्या सोलापुरात करोनाबाधित रुग्णांची संख्या टाळेबंदीच्या चौथ्या टप्प्याच्या अखेरीसही प्रचंड वेगाने वाढत आहे. मागील तीन दिवसांतच दोनशे रुग्ण वाढले आहेत. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत नव्याने तब्बल १०३ जणांचे अहवाल सकारात्मक आल्याने एकूण रुग्णसंख्या ८५१ झाली असून मृतांचा आकडाही आता ७२ झाला आहे. आज निष्पन्न झालेल्या रुग्णांमध्ये सोलापूर जिल्हा कारागृहातील तब्बल ३४ कैद्यांचा समावेश आहे.

सोलापुरात करोनाबाधित पहिला रुग्ण १२ एप्रिल रोजी आढळून आला होता. त्यानंतर हळूहळू रुग्णसंख्या वाढत गेली असताना प्रामुख्याने वृध्द मंडळीच करोना विषाणूची शिकार होत असल्याचे पाहावयास मिळते. २० मे पर्यंत रुग्णसंख्या ४७०, तर मृतांची संख्या ३३ इतकी होती. गेल्या दहा दिवसांत रुग्णांची संख्या जवळपास दुप्पट गतीने वाढून ८५१ झाली आहे. मृतांच्या संख्येतही तेवढय़ाच गतीने वाढ झाली आहे.

सुरुवातीला प्रशासनाने ज्या पध्दतीने घरोघरी सर्वेक्षण करून संशयित रुग्णांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, त्यातून काहीही निष्पन्न न होता उलट वेळ वाया गेल्याचे दिसून आले. प्रामुख्याने दाटीवाटीच्या झोपडपट्टय़ांमध्ये करोना विषाणू फैलावत असून त्यावर नियंत्रण ठेवणे कठीण होत चालले आहे. अलीकडे तर करोनाचा प्रादुर्भाव गावठाण भागातही पसरला आहे. शहरातील एखाद्याच भागात करोना विषाणूने शिरकाव केला नसेल, अशी स्थिती असतानाच आता ग्रामीण भागातही रुग्णसंख्या वाढू लागली आहे. जिल्ह्यत अक्कलकोट, मोहोळ, माळशिरस, पंढरपूर, सांगोला, बार्शी, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आदी आठ तालुक्यांमध्ये करोनाचा प्रसार होऊन ३५ पेक्षा अधिक व्यक्तींना करोनाने बाधित केले आहे.

इकडे शहरात करोना प्रसार आटोक्यात न येता उलट त्यात वाढच होत असल्यामुळे शहरातील गेले दोन महिने ठप्प झालेले अर्थचक्र इतक्यात पुन्हा सुरू होण्याची आशा मावळली आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणखी कठोर उपाययोजना हाती घेण्याची गरज निर्माण झाली असताना प्रशासनासमोर नवनवीन आव्हानेही उभी ठाकली आहेत.

तथापि, एकीकडे करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी दुसरीकडे करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढत आहे. हा सोलापूरकरांसाठी दिलासा मानला जात आहे. आतापर्यंत ३२१ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. मात्र त्याचवेळी मृतांची ७२ पर्यंत वाढलेली संख्या चिंतेचा विषय झाला आहे.

३४ कैद्यांना करोना

दरम्यान आज नव्याने निष्पन्न झालेल्या १०३ रुग्णांमध्ये सोलापूर जिल्हा कारागृहातील तब्बल ३४ कैद्यांचा समावेश आहे. एवढय़ा मोठय़ा संख्येन कैद्यांना करोना झाल्याने असल्यामुळे एकच खळबळ उडाली. याच कारागृहातील एका कर्मचाऱ्यालाही करोनाने बाधित केल्याचा प्रकार काल उघडकीस आला होता.