सोलापूर शहरात शुक्रवारी ५६ करोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण बाधित रुग्णसंख्या आता पाच हजारांच्या घरात म्हणजे ४९८५ वर गेली आहे. तर मृतांचा आकडाही ३५९ झाला आहे. शहर व जिल्ह्यातील मिळून बाधित रूग्णसंख्या ८४४४ झाली असून मृतांची संख्या ४५७ वर पोहोचली आहे. करोनामुक्त होण्याचे एकूण प्रमाण ५९ टक्के असले तरी मृत्यूचे प्रमाण ५.४१ टक्के आहे.

शुक्रवारी शहरात करोना चाचण्यांचे ९७६ अहवाल प्राप्त झाले. यात ५६ बाधित रूग्ण सापडले. तर तिघांचा मृत्यू झाला. दुसरीकडे ३७ रूग्ण यशस्वी उपचार घेऊन करोनामुक्त झाले. शहरात करोनामुक्त होण्याचे प्रमाण ६०.९० टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण ७.२० टक्के आहे. दुसरीकडे जिल्हा ग्रामीणमध्ये काल गुरुवारी रात्री प्राप्त झालेल्या चाचणी अहवालांनुसार दिवसभरात ७५८ चाचणी अहवाल हाती आले असता त्यात १४७ बाधित रुग्ण आढळून आले. याशिवाय तीन रुग्णांचा मृत्यू झाला. ग्रामीण भागात आतापर्यंत एकूण रूग्णसंख्या ३४५९ झाली आहे. तर मृत्यूचा आकडा शंभरी ओलांडण्याच्या तयारीत ९८ वर गेला आहे. दुसरीकडे करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १९५७ म्हणजे ५६.५७ टक्के झाली आहे. तर मृत्यूचे प्रमाण २.८३ टक्के आहे. शहर व जिल्ह्यातील मृत्यूचे प्रमाण ५.४१ टक्के असले तरीही राज्यात हे प्रमाण सर्वाधिक मानले जाते. शहर व जिल्ह्यात आतापर्यंत एकूण झालेल्या ५९ हजार ५४० चाचण्यांमध्ये ८४४४ बाधित रुग्ण सापडले आहेत. चाचण्यांच्या तुलनेत बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण १४.१८ टक्के इतके आहे.